मायणीत टँकरचे पाणी पिवळे आणि दुर्गंधीयुक्त 

संजय जगताप
सोमवार, 21 मे 2018

मायणी - तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसुन आधीच हैराण झालेल्या येथील माळीनगरमधील नागरिकांना टॅंकरने पिवळे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवले जात आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. आज पंचायतीमधील विरोधी गटनेत्यांनी टॅंकरच्या पाण्याची प्रत्यक्ष पोलखोल करुन प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.  

मायणी - तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसुन आधीच हैराण झालेल्या येथील माळीनगरमधील नागरिकांना टॅंकरने पिवळे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवले जात आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. आज पंचायतीमधील विरोधी गटनेत्यांनी टॅंकरच्या पाण्याची प्रत्यक्ष पोलखोल करुन प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.  

त्याबाबत विरोधी गटनेते रणजीत माने यांनी माहिती दिली. माळीनगरला मार्चच्या अखेरीपासुन पाणीटंचाईने ग्रासले आहे. लोकांनी मागणी करुनही त्यांना पाणीपुरवठा करण्यात आला नाही. ग्रामपंचायतीने टॅंकरचा प्रस्ताव देऊनही तालुका प्रशासनाकडुन दखल घेतली नाही. गेल्या दोन-तीन दिवसापुर्वी तेथे टॅंकरने पाणीपुरवठ्यास सुरवात झाली. मात्र पाणी पुरवठा करणारा टॅंकर आधी मळी वाहतुकीला वापरला जात असल्याने त्याद्वारे आता पुरवठा करण्यात येत असलेले पाणी मळीयुक्त व पिवळे आहे. पाण्याला दुर्गंधीही येत आहे. त्यामुळे पाणी पिण्यास योग्य नसल्याच्या लोकांच्या तक्रारी येत आहेत.

पिण्यासाठी असे घाण पाणी पुरवले जात असल्याबाबत संताप व्यक्त होत आहे. त्याची दखल घेत रणजीत माने, माजी उपसरपंच दादासाहेब कचरे, महेश जाधव, गजानन माळी शहाजी माळी, अविनाश दगडे आदींनी माळीनगरला आज भेट दिली. टॅंकरने वितरीत केलेले पाणी पाहिले. तेव्हा पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी असल्याचे त्यांच्याही निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तेथील पाण्याचे नमुने घेऊन थेट प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. तेथील वैधकीय अधिकारी डॉ. देशपाल चव्हाण यांचेशी चर्चा केली. त्यांनी सदरचे पाणी दुषित असुन, ते पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. लोकांनीही ते दुषित पाणी पिण्यासाठी वापरु नये असे आवाहन केले. 

संबंधित टँकर चालक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन टँकर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्याकडे ग्रामपंचायत डोळेझाक करीत असल्याचा आरोप माने यांनी केला असुन, दुषित पाण्यामुळे तेथे साथीचे रोग फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

तालुका प्रशासन व ग्रामपंचायतीने तातडीने मळीयुक्त पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा बंद करुन पिण्यास योग्य पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. 

दुषित पाणीपुरवठा होत असल्याचे लक्षात येताच त्याबाबत पंचायत समितीला कळवले असुन, आधी मळी वाहतुक केलेले टॅंकर बदलण्यास सांगितले आहे. 
- सचिन गुदगे (सरपंच, मायणी) 

दूषित पाणीपुरवठा होत असूनही आरोग्य विभाग व ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. केवळ सूचना न देता कार्यवाही करणे गरजेचे आहे. 
- अर्चना जाधव नागरिक

Web Title: The water of the tanker is yellow