सातारा जिल्ह्यात दुष्काळी तालुक्‍यातील टॅंकर झाले बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

 मुसळधार पावसाचा परिणाम; बुधवारपर्यंत सुरू होते 95 टॅंकर.

काशीळ ः जिल्ह्यात सुरू असलेली अतिवृष्टी पश्‍चिमेकडे नुकसानकारक ठरत असली, तरी पूर्वेकडील दुष्काळी तालुक्‍यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरली आहे. माण, खटाव, फलटण तालुक्‍यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीटंचाई पूर्णपणे कमी झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या वतीने आजपासून सर्व टॅंकर बंद केले आहेत. परतीच्या पावसाने दुष्काळी जनतेस दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात या पावसाळ्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र, झालेला बहुतांशी पाऊस पश्‍चिम भागात झाल्याने या परिसरातील अनेक नद्यांना पूर आल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 
जिल्ह्याच्या पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्‍यांत मात्र ऐन पावसाळ्यात अनेक गावांतील जनतेस पाण्यासाठी टॅंकरवर अंवलबून होती. पावसाळ्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे येथील जनतेस टंचाईचे चटके सहन करावे लागत होते. पिण्याच्या पाण्याची अवस्था वाईट असल्याने शेतीस पाणी कुठून मिळणार यामुळे या परिसरातील नापेर क्षेत्रही मोठ्या प्रमाणात 

राहिले आहे. किती दिवस टॅंकर अवंलबून राहवे लागणार असा प्रश्न येथील जनतेकडून विचारला जात होता. मात्र, बुधवारी (ता. 25) या तीन तालुक्‍यांतील 79 गावे 606 वाड्यावस्त्यांवरील एक लाख 38 हजार 692 जनतेस 95 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. टॅंकर बंद होईल, की नाही अशी भीती असतानाच परतीच्या पावसाने येथील जनतेस दिलासा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून माण, खटाव, फलटण या तालुक्‍यांसह सर्वच भागांस पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले आहे.

या पावसामुळे अनेक वर्षांपासून न वाहिलेल्या माणगंगा, बाणगंगा, तसेच अनेक पाझर
तलाव, सिमेंट बंधारे दुधडी भरून वाहिले. कधी न पाहिलेले पाणी दुष्काळी तालुक्‍यांतून वाहिले आहे. परिणामी सुरू असलेली टंचाई पूर्णपणे कमी झाली आहे. यामुळे सर्वच तालुक्‍यांतील टॅंकर बंद करण्यात आले आहेत. 

बुधवारपर्यंत तीन तालुक्‍यांत 95 टॅंकर सुरू होते. मुसळधार पावसामुळे 
गुरुवारी टॅंकरची संख्या 23 वर आली होती. त्यानंतर प्रशासनाकडून टंचाईचा 
आढावा घेऊन शुक्रवारी टॅंकर बंद करण्यात आले आहेत. 

 

पश्‍चिमेत पिके कुजण्याची भीती
 
पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाल्यामुळे दुष्काळी जनतेत समाधान व्यक्त होत आहे. मात्र, पश्‍चिमेकडील शेतकरी या पावसामुळे अडचणीत आला आहे. शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेली पिके कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water tankers closed in Satara district drought area