नीरा डाव्या कालव्यातुन विद्युत पंपाद्वारे पाणीचोरीचा सपाटा

राजकुमार थोरात
बुधवार, 11 एप्रिल 2018

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये नीरा डाव्या कालव्यातुन आठमाही पाणी उपशाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपली आहे. असे असताना सुद्धा अनेक आठमाही परवाना धारक कालव्यातुन अद्याप राजरोसपणे पाण्याची चोरी करीत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वालचंदनगर - इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये नीरा डाव्या कालव्यातुन आठमाही पाणी उपशाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपली आहे. असे असताना सुद्धा अनेक आठमाही परवाना धारक कालव्यातुन अद्याप राजरोसपणे पाण्याची चोरी करीत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये नीरा डाव्या कालव्यातुन सुमारे ३० शेतकऱ्यांना आठमाही पाणी उपासा करण्याची परवानगी आहे. या शेतकऱ्यांची कालव्यातुन पाणी उपशाची मुदत २८ फेब्रुवारीलाच संपली आहे. सध्या नीरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामाचे आवर्तन सुरु आहे. कालव्यालगतचे अनेक शेतकरी सायफनद्वारे पाणी चोरी करीत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी वेळेमध्ये मिळत नाही. यामुळे पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

गतवर्षी पाणीचोरीचे प्रमाण वाढल्यामुळे पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे सुमारे सात हजार एकरातील पिके जळून खाक झाली होती. यावर्षीही मोठ्या शेतकऱ्यांनी पाणीचोरीचा सपाटा लावला आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे व इतर पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने पाणी चोरी सुरु असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अंथुर्णे शाखेचे शाखाधिकारी श्‍यामराव भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, आठमाही परवानगी असणाऱ्या शेतकऱ्यांनी कालव्यातुन पाणी उपसा करु नये असे त्यांनी म्हटले आहे. तसेच विद्युत मोटर काढून ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे आठमाही पाणी उपसा करण्याचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: water theft from neera water canal