लोधवडे - पाणलोट विकासाचे मॉडेल

रूपेश कदम
शनिवार, 28 एप्रिल 2018

मलवडी - लोधवडे (ता. माण) हे गाव जलसंधारणासह पाणलोट विकासात तालुक्‍यालाच नव्हे तर राज्याला दिशा देणारे ठरले आहे. पाणलोट विकासाचे रोल मॉडेल म्हणून याकडे पाहिले जाते.

मलवडी - लोधवडे (ता. माण) हे गाव जलसंधारणासह पाणलोट विकासात तालुक्‍यालाच नव्हे तर राज्याला दिशा देणारे ठरले आहे. पाणलोट विकासाचे रोल मॉडेल म्हणून याकडे पाहिले जाते.

आदर्श गाव योजनेत सहभाग घेतल्यापासून या गावाने कात टाकली. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रीचा कटाक्षाने अवलंब केला. कडधान्य उत्पादनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्य स्तरावर तिसरा क्रमांक, निर्मलग्राम पुरस्कार, यशवंत पंचायत राज अभियान विभागीय पुरस्कार, मूलस्थानी मृद व जलसंधारण राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, तंटामुक्तीमध्ये विशेष पुरस्कार, स्मार्ट व्हिलेज म्हणून जिल्ह्यात प्रथम अशी अनेक बक्षिसे गावाला मिळाली. २००४-०५ साली ‘नंदनवन’ प्रकल्पाचे प्रमुख फादर डिकोस्टा यांनी भेट दिल्यावर गावात पाणलोट विकासाच्या कामास सुरवात झाली. स्वित्झर्लंडमधील रोनाल्ड फुटिंग यांनीही गावास मदत केली. डोंगर उतारावर १५० हेक्‍टर क्षेत्रावर सलग समतल चर तसेच १७ हजार मीटर लांबीची चर खोदण्यात आली. त्यात साडेसात लाख लिटर पाणी जिरविण्याची क्षमता आहे.

लोधवड्यात ४९३ हेक्‍टर क्षेत्रावर बांध-बंदिस्ती, तीन गॅबियन बंधारे, भूमिगत बंधारा, कृषी विभागामार्फत विविध योजनांमधून २८ माती नालाबांध, १६ शेततळी, शासनाच्या विविध योजनांतून १३ सिमेंट बंधारे बांधलेत. एक हजार २३३ हेक्‍टर क्षेत्रावर पाणलोट विकास केल्याने ६५० सहस्र घनमीटर पाणीसाठा वाढला. जलसंधारणाच्या कामांतून लोधवडे पाणीदार झाले. बारमाही पाणी उपलब्ध असल्याने पीक पद्धतीतही बदल झाला. पारंपरिक शेतीला छेद देत तुषार व ठिबक सिंचनाद्वारे ऊस, डाळिंब, कांदा अशी नगदी पिके घेतली जात आहेत.

पाणलोट विकास व जलसंधारणाच्या कामांच्या बळावर गावाला पाणीदार करू शकलो. जलसंधारणाची कामे सुरू केल्यानंतर गावात एकही नवीन बोअरवेल घेतली नाही तसेच विहीर खोल केली नाही, एवढे पाणी उपलब्ध झाले.
- दिलीप चव्हाण, अध्यक्ष, पाणलोट समिती, लोधवडे

Web Title: Watercolor development model well water