आरक्षणाशिवायच्या भरतीला मराठा सेवा संघाचा विरोध - अध्यक्ष विजयसिंह महाडिक

नागेश गायकवाड
रविवार, 8 जुलै 2018

भरतीला मराठा सेवा संघाचा विरोध असून ती होऊ देणार नसल्याचा खणखणीत इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी येथे दिला.  

आटपाडी - मराठा समाजाला आरक्षण लागू केल्यानंतरच 36 हजाराची मेगा भरती करावी. आरक्षणाशिवायची भरती समाजावर अन्याय करणारी आहे. भरतीला मराठा सेवा संघाचा विरोध असून ती होऊ देणार नसल्याचा खणखणीत इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी येथे दिला.      
               
येथील वैकूठ भवन येथे मराठा सेवा संघाने समाजातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळयाचे आयोजन केले होते. यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. सेवा संघाचे प्रवक्ते विनायकराव गायकवाड, वाळवा तालुकाध्यक्ष अभिषेक पाटील, तालुकाध्यक्ष बापूसो गिडडे उपस्थित होते. स्वागत श्री. गिडडे यांनी तर प्रास्ताविक प्रा.सदाशिव मोरे यांनी केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. श्री. महाडिक म्हणाले, 'नोकरभर्तीचे स्वागत आहे पण आरक्षणाचा निकाल लागल्याशिवाय केल्यास समाजावर मोठा अन्याय करणारे आहे. जर सरकारने रेटून भर्ती केली तर 2019 ला समाज पाणीपत केल्याशिवाय राहणार नाही.'    

ते म्हणाले, 'राज्यात समाजाचे 146 आमदार आहेत तरीही आरक्षण मिळत नसेल तर यांचे लोणचे घालायचे आहे का? मराठा आमदारांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.' सेवा संघाचे प्रवक्ते विनायकराव गायकवाड यांनी समाजाने एकत्र येण्याची गरज आणि वेळ आली असल्याचे सांगितले. तसेच छत्रपतींचे विचार समाजात रुजवण्याचे काम करण्याचे आव्हान तरुणांना केले. यावेळी वसंतराव गायकवाड, बळीअण्णा मोरे, डी एम पाटील, पोपट पाटील, अशोक देशमुख, प्रा. विश्वनाथ जाधव, अॅड. धनंजय पाटील, शरद पवार,गैरीहार, पवार, प्रा. संभाजी पाटील आदी उपस्थित होते. प्रा. विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: we are against of recruitment without reservations maratha seva sangha