जानकर, आठवलेंना योग्यवेळी महाविकास आघाडीत आणू : राजू शेट्टी

Raju_Shetty
Raju_Shetty

सोलापूर : भारतीय जनता पक्षात (कै.) गोपीनाथराव मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले आहे. (कै.) मुंडे यांच्याबाबतीत भाजप जशा पद्धतीने वागत होता तशाच पद्धतीने आज मुंडे समर्थकांना भाजपमध्ये वागणूक मिळत आहे. भाजपमधील वागणुकीची मुंडे समर्थकांची जखम तशी जुनीच आहे. हीच जुनी जखम आज भळभळू लागली असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज सोलापुरात झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार शेट्टी म्हणाले, सदाभाऊ खोत यांच्याशी कधी माझं बोलणं होत नाही परंतु माजी मंत्री महादेव जानकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विनायक मेटे यांच्याशी माझे आजही अधून-मधून बोलणे होते. माझ्या या जुन्या मित्रांना योग्य वेळी महाविकास आघाडीत मी घेऊन येईन, अशी माहितीही शेट्टी यांनी दिली. नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. 11 जानेवारीपर्यंत सर्व नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाईल. 11 फेब्रुवारीपर्यंत प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत माझ्या मंत्रिपदाबाबत अद्याप कसलीही चर्चा झाली नाही. आम्हाला सत्तेत घ्यावे यासाठी याचक म्हणून कटोरा घेऊन आम्ही कोणाकडेही जाणार नाही. मी मंत्री झालो तरीही माझ्या भाषेत बदल होणार नाही, आज मी जे शेतकऱ्यांसाठी बोलतोय तीच माझी भाषा कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

"ढेकूण झाले म्हणून कोणी घर जाळतंय का?' 
बाजार समित्यांमध्ये दोष आहेत. दोष आहेत म्हणून बाजार समित्याच बरखास्त करणे म्हणजे ढेकूण झाले म्हणून घर जाळण्यासारखे आहे. ई-नाम आणि नवीन तंत्रज्ञानाला आम्ही कधीच विरोध केला नाही. ई-नाम राबविण्याची बाजार समित्यांची क्षमता आहे का? याचाही अभ्यास करावा. ई-नाममध्ये लहान शेतकऱ्यांना बाजारपेठ कशी मिळणार, याबद्दलही विचार झाला पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले. 

"सातबारा कोरा करा, पाच वर्षे काहीच देऊ नका' 
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा काय अंतिम उपाय नाही, परंतु आज शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याशिवाय पर्यायही नाही. शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यांमध्ये कर्जमाफी नकोय. एकदाच सरसकट कर्जमाफी द्या, पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना काही नाही दिले तरीही चालेल. आमच्या माहितीनुसार राज्यातील शेतीपंपाचे 11 हजार कोटी रुपये थकीत आहेत. विजेचा वापर नसतानाही बिलाची आकारणी झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची वीजबिल माफी अथवा वीज बिलात सूट देणारी योजना सरकारने जाहीर करावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com