हत्यार परवान्यांची संख्या घटवणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

कोल्हापूर - जिल्ह्यात पोलिसांपेक्षा लोकांकडे हत्यार परवाने व शस्त्रेही जास्त झाली आहेत. ही संख्या कमी करण्यासाठी शासनासह प्रशासनाने कडक निर्बंध आणले आहेत. हत्यार परवाना नूतनीकरणाची फी ६० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचा दाखला व परवान्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर केल्याचा पुरावा जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

कोल्हापूर - जिल्ह्यात पोलिसांपेक्षा लोकांकडे हत्यार परवाने व शस्त्रेही जास्त झाली आहेत. ही संख्या कमी करण्यासाठी शासनासह प्रशासनाने कडक निर्बंध आणले आहेत. हत्यार परवाना नूतनीकरणाची फी ६० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचा दाखला व परवान्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर केल्याचा पुरावा जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

कोल्हापुरात वाहनांसाठी व्हीआयपी नंबर व नावांवर हत्यार परवाना घेण्याची मोठी ‘क्रेझ’ आहे. हौसेला मोल नाही म्हणतात, तसेच या दोन गोष्टींसाठी झाले आहे. वाटेल ती किंमत मोजून चांगला नंबर घेणाऱ्या वाहन मालकांबरोबरच हत्यार परवान्यासाठी थेट मुख्यमंत्री यांचाही फोन आणणाऱ्यांची संख्याही कमी नाही. त्यामुळे कोल्हापुरात पोलिस तीन ते साडेतीन हजार आणि हत्यार परवाने मात्र तब्बल १४ हजारांच्या घरात पोचले आहेत. 

शासनाच्या गृहविभागानेही काही जिल्ह्यांतील या परिस्थितीतीची गंभीर दखल घेतली आहे. त्यातून हत्यार परवाना नूतनीकरणासाठी कडक निर्बंध आणले आहेत. सध्या देशभरातील हत्यार परवान्यांची नोंद एकत्रित करण्याचे काम सुरू होते, त्यासाठी संबंधित व्यक्तींनी आपण रहात असलेल्या पोलिस ठाण्यात ही नोंद करणे बंधनकारक होते. ही नोंद नसेल तर हत्यार परवानाच रद्द होणार आहे. ही नोंद झाल्याचा पुरावा हत्यार परवान्याच्या पुस्तकावर चिकटवावी लागणार आहे. 

पूर्वी हत्यार परवान्यासाठी प्रति हत्यार ६० रुपये फी होती, ही फी आता प्रति हत्यार ५०० रुपये करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर ही हत्यार परवान्याची शेवटची मुदत आहे. पूर्वी हत्याराची परवान्यावर नोंद करणे, नोंद रद्द करणे यासाठी फी नव्हती, आता मात्र या दोन्ही कारणांसाठीही प्रत्येकी ५०० रुपये शुल्क तेही ट्रेझरीत जाऊन भरावे लागणार आहेत. फी भरलेल्या या चलनासोबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तंदुरुस्त असल्याचा दाखला जोडावा लागणार आहे. हत्यार परवाना राहू दे, पण हा त्रास नको, अशी व्यवस्था केली आहे. 

प्रांताधिकाऱ्यांकडून छाननी
हत्यार परवाना नूतनीकरणाचे काम त्या त्या प्रांताधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. या नूतनीकरणाच्या कामात हत्यार परवानाधारकांची छाननी होणार आहे. वरील कागदपत्रे नसतील तर हत्यार परवाना रद्दच करण्याच्या सूचना शासनाच्या आहेत. यादृष्टीने प्रांताधिकारी कार्यालयात यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

Web Title: Weapon number of licenses decrease