संत मुक्ताबाई पालखीचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत

सुदर्शन हांडे
बुधवार, 18 जुलै 2018

बार्शी - विठ्ठल नामाचा जयघोष करत राज्यातील मानाच्या पालखी सोहळ्यातील एक असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे वारदवाडी फाटा येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. निर्मल वारी, हरित वारी हा संकल्प घेऊन निघालेल्या या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. 

बार्शी - विठ्ठल नामाचा जयघोष करत राज्यातील मानाच्या पालखी सोहळ्यातील एक असलेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे वारदवाडी फाटा येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. निर्मल वारी, हरित वारी हा संकल्प घेऊन निघालेल्या या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. 

संत मुक्ताबाई पालखीने सोलापूर जिल्ह्यात स्वागतासाठी पालखी मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. जिल्ह्यात प्रवेश करताच फटाके फोडून तसेच तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्याहस्ते पादुका पूजन करून पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी उपसभापती अविनाश मांजरे, नायब तहसीलदार मुरलीधर भोई, तालुका आरोग्य अधिकारी संतोष जोगदंड, उपअभियंता अय्युब शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, शेंद्रीच्या सरपंच चंपाबाई मदने, उपसरपंच महेश चव्हाण, मंडलाधिकारी विशाल नलवडे, ग्रामसेवक विशाल गावडे आदी उपस्थित होते. 

संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे हे ३०९ वे वर्ष असून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून ही पालखी चालत येते. मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरून निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात खानदेश व मध्यप्रदेश भागातील वारकरी सहभागी झालेले आहेत. या पालखी सोहळ्यात एकूण २५ दिंड्या सहभागी झालेल्या आहेत. पालखी सोहळ्यात सुमारे दीड हजार वारकरी सहभागी झाले आहेत. संत मुक्ताबाई पादुका रथाच्या पुढे आठ दिंड्या तर मागे सतरा दिंड्या सहभागी झालेल्या असतात. मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे गोल रिंगण जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे तर बीड येथे उभे रिंगण पार पडले आहे. १७ जून रोजी मुक्ताई नगर येथून निघालेला हा पालखी सोहळा जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद असे पाच जिल्हे पार करून तब्बल एक महिन्यांनी आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.

या पालखी सोहळ्यासोबत आठ वाहने, दोन टँकर, एक वैद्यकीय पथक आहे. संपूर्ण पालखी सोहळ्याचे नियोजन वारकरी-फडकरी-कीर्तनकार महासंघाचे अध्यक्ष तथा मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख हभप रवींद्र महाराज हरणे, विश्वस्त पंजाबराव पाटील, ज्ञानेश्वर महाराज हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. 

आज बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे पालखीचा मुक्काम असून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी शाळेत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाण्याचे टँकर, गावात सर्वत्र स्वच्छता करण्यात आली आहे, तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथक, दोन रुग्णवाहिका अशी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सर्व शासकीय यंत्रणांना सूचना देऊन शक्य ती सर्व मदत देण्याचे आदेश तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिले आहेत. 

निर्मल वारी...हरित वारी...
हा संकल्प घेऊन निघालेल्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी पालखी वर्गावर ५० हजार बियाचे रोपण रस्त्याच्या दुतर्फा केले आहे. तसेच शेतकऱ्यांना वृक्षची भेट देऊन बांधावर मुक्ताईवृक्ष लावण्याची विनंती केली.

स्वागताने वारकरी गेले भारावून....
संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन होताच प्रशासनाने केलेल्या स्वागताने वारकरी भारावून गेले. सोलापूर जिल्ह्या प्रमाणेच इतर जिल्ह्यातील प्रशासनाला विठ्ठल सद्बुद्धी देवो अशी भावना सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी व्यक्त केली. 

Web Title: Welcome to Sant Muktabai Palkhi Solapur District