जिमला गेला अन्‌ गुन्ह्यात फसला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

बारावीचं शिक्षण घेत असताना त्याला व्यायामाची आवड लागली आणि तो जिमला जाऊ लागला. त्याची अचानक एका कुख्यात गुन्हेगाराशी ओळख झाली. तो त्या व्यायाम करणाऱ्या गुन्हेगाराकडे आकर्षित झाला आणि अल्पवयातच कायद्याच्या कचाट्यात सापडला.

नगर : बारावीचं शिक्षण घेत असताना त्याला व्यायामाची आवड लागली आणि तो जिमला जाऊ लागला. त्याची अचानक एका कुख्यात गुन्हेगाराशी ओळख झाली. तो त्या व्यायाम करणाऱ्या गुन्हेगाराकडे आकर्षित झाला आणि अल्पवयातच कायद्याच्या कचाट्यात सापडला. 

नगर शहरातील एका प्रसिद्ध उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. चार अज्ञात तरुणांनी त्यांना भल्या पहाटे उचलून नेले होते. तांत्रिक तपासाच्या आधारे करीमभाई जालना येथे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यामुळे पोलिसांची पथके जालन्याच्या दिशेने रवाना झाली. पैसे देण्याचे ठरल्यानंतर आरोपींनी करीमभाई यांना जालना येथे सोडून दिले. ते सुखरूप नगरला पोचले. 

परतूरमधून दोघांना पकडले 

दरम्यान, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी परतूर (जि. लातूर) येथून संशयित दोघांना पकडले. त्या वेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आज त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यातील एकाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली, तर एक जण अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. 

तो बारावीत शिकतो 

तो अल्पवयीन मुलगा परतूर येथे बारावीमध्ये शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती बेताचीच असून, वडील एसटी महामंडळामध्ये चालक आहेत. तो एका जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जात होता. तेथे गेल्या आठ दिवसांपासून अजहर शेख व्यायामासाठी येत होता. त्या वेळी अजहरने त्या दोघांना विश्‍वासात घेतले. आपल्याला पुण्याला फिरायला जायचे असल्याचे सांगून तो त्यांना नगरमध्ये घेऊन आला आणि येथे उद्योजकाच्या अपहरणामध्ये सहभागी केले, असेही तपासात समोर आले आहे. 
 
त्याच्या बोलण्याला भुलले 
 

आरोपी अजहर शेख विविध गुन्ह्यांत सराईत आहे. परतूरमधील बीसीआर जिममध्ये तो व्यायामासाठी जात होता. चारचाकी वाहन घेऊन तो जिमला जात असल्याने हे दोघे तरुण त्याच्याकडे आकर्षित झाले. मी मोठा गुंड असून, लोक मला घाबरतात, असे तो म्हणायचा. त्यामुळे तरुण मुले त्याच्या जाळ्यात अडकली. 

अन्य सराईत गुन्हेगार 

अपहरणाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगा वगळता अन्य आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. अजहर शेख याच्यावरही तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: went gym and got involved in crime