छगन भुजबळ जेव्हा इक्‍बाल शेख बनतात... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कर्नाटक सरकारने 1 जून 1986 पासून सीमाभागात कन्नडची सक्‍ती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सीमाभागात एकच आगडोंब उसळून या विरोधात संतप्त वातावरण निर्माण झाले. या कन्नड सक्‍तीचे पडसाद महाराष्ट्रातसुद्धा उमटले होते. यावेळी छगन भुजबळ इक्‍बाल शेख बनून बेळगावात दाखल झाले होते.

बेळगाव : कर्नाटक सरकारने 1 जून 1986 पासून सीमाभागात कन्नडची सक्‍ती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सीमाभागात एकच आगडोंब उसळून या विरोधात संतप्त वातावरण निर्माण झाले. या कन्नड सक्‍तीचे पडसाद महाराष्ट्रातसुद्धा उमटले होते. यावेळी छगन भुजबळ इक्‍बाल शेख बनून बेळगावात दाखल झाले होते. त्या घटनेच्या आठवणी आजही ताज्या असून हुतात्मा दिनाच्या पुर्वसंध्येला कन्नड सक्‍ती आंदोलनाची चर्चा आजही सीमाभागात ऐकावयास मिळत आहे. 

बेळगावात 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधात आंदोलन होणार होते. त्या आंदोलनाला महाराष्ट्रातून अनेक नेते मंडळी येतील म्हणून कर्नाटक राज्याच्या पोलिसांनी कर्नाटकच्या सगळ्या सीमा बंद करण्यात आल्या. यामुळे येणाऱ्यांची कसून चौकशी आणि खात्री करूनच प्रवेश दिला जात होता. मात्र कोल्हापूर येथील बैठकीत एस. एम. जोशी व शरद पवार यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शरद पवार बेळगावला वेषांतर करून निघाले तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार छगन भुजबळसुद्धा बेळगावकडे निघाले. 

छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम गोव्याला प्रस्थान केले, त्यानंतर त्यांनी इक्‍बाल शेख या नावाला साजेशी अशी वेशभूषा धारण करुन ड्रायव्हर सोबत गाडी घेऊन चोर्ला रोड मार्गे बेळगावमध्ये येत असताना जांबोटीजवळ त्यांची कार पोलिसांनी अडविली. ड्रायव्हरने, साहेब विदेशी व्यापारी आहेत त्यासाठी ते बेळगावला निघाले आहेत असं सांगून पोलिसांची दिशाभूल करून सुटका करून घेतली आणि छगन भुजबळ बेळगावमध्ये रात्री पोहचले. आणि दुसऱ्या दिवशी कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील आंदोलनास उपस्थित राहिले आणि आंदोलन यशस्वी केले. 

कडेकोट पोलिस बंदोबस्त असतानाही शरद पवार आणि छगन भुजबळ आंदोलन स्थळी पोहचल्यानंतर पोलिस चक्रावून गेले. या रागातूनच कर्नाटक पोलिसांनी आंदोलनस्थळावर जमलेल्या शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर लाठीमार केला. या घटनेची माहिती सीमाभागात समजताच आंदोलन तीव्र झाले. यावेळी कर्नाटक पोलिसांकडून मराठी भाषिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले. तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात नऊ कार्यकर्त्यांनी हौतात्म्य पत्करले. म्हणूनच दरवर्षी 1 जून रोजी या हौतात्म्यांना अभिवादन केले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Chhagan Bhujbal becomes Iqbal Shaikh