स्वच्छतागृहाची मोफत सुविधा असताना, प्रति महिला पाच रुपये आकारणी 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सोलापूर - महिला व मुलांसाठी एसटी स्थानकावरील स्वच्छतागृहांची सुविधा मोफत असतानाही प्रती महिला  पाच रुपये घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा मागोवा घेतला असता गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतागृहावर धावा बोलत मक्तेदाराला हुसकावून लावले. परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याच शहरात हा प्रकार होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

एसटी स्थानक परिसरातील रिक्षाचालकांनी तेथील दुरवस्थेची माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना दिली. त्याचवेळी चर्चेदरम्यान, येथील स्वच्छतागृह मोफत असताही महिलांकडून पैसे घेतले जात असल्याची माहिती एका महिलेने दिली. त्यामुळे उपस्थित सर्व रिक्षाचालक व कार्यकर्त्यांसह सर्वांनी स्वच्छतागृह गाठले. त्या ठिकाणी महिलेकडून पैसे घेत असल्याचेही दिसून आले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मक्तेदाराला हुसकावून लावले. धक्कादायक बाब म्हणजे या संदर्भात स्थानक प्रमुख श्री. दळवी यांनी मक्तेदाराला जाब विचारला असता, यापुढे अशी चूक होणार नाही, अशी कबुली दिली. 

पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आल्यामुळे संबंधित मक्तेदाराला यापूर्वी दोनदा 500 रुपये दंड करण्यात आल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले. मध्यमवर्गीय व चांगल्या आर्थिक स्थितीतील महिला काही न बोलता पैसे देतात, मात्र ग्रामीण भागातून आलेल्या गरीब महिला कुठून पैसे देणार? त्यांच्यासमवेत चार-पाच महिला असतील तर, त्यांना 25 रुपये मोजावे लागत होते. तिकिटाला पैसे कमी असताना स्वच्छतेसाठी कुठे पैसे द्यायचे, हा विचार करून या महिलांना नाइलाजाने स्थानकाच्या परिसरात नैसर्गिक विधी उरकावा लागत आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने आता तरी गैरप्रकार थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या वेळी रिक्षा युनियनचे प्रमुख बाळासाहेब बाबर, बंडू माने, उस्मान शेख, नागेश वाघमोडे, मच्छिंद्र मसलखांब, विजय लोखंडे, सचिन कवडेकर, विजय सोनार, विशाल लोंढे, राहुल बनसोडे, लक्ष्मण अंकुश, प्रमोद साबळे, संजय उडाणशिवे, अरुण लोखंडे, मधुकर बनसोडे, विजय बनसोडे, ज्ञानेश्‍वर कांबळे, खंडू साबळे, फय्याज शेख, उद्धव भोसले, मनोज अवस्थी, श्रीराम गायकवाड उपस्थित होते. 

मोफत सुविधांचा फलक लावून पैसे घेणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे मक्तेदाराचा मक्ता रद्द करावा. पुन्हा हा प्रकार दिसून आल्यास स्वच्छतागृहासमोरच ठिय्या आंदोलन केले जाईल. 
- आनंद चंदनशिवे, नगरसेवक 

Web Title: When the sanitary toilets are free, charge of 5 rupees per woman