
मिरजेचा ‘पुष्पा’ कोण? चंदन तस्करीचे एकेकाळी होते मुख्य केंद्र
सांगली : बंगळूरहून कोल्हापूरला निघालेल्या रक्तचंदनाची (लाल चंदन) तस्करी आज मिरज पोलिसांनी पकडली आणि पुन्हा एकदा मिरजेचे चंदन कनेक्शन चर्चेत आले. चंदन तस्करीसाठी मिरज कुख्यात मानले जायचे. एकेकाळी इथे चंदन तस्करीचे ‘सिंडिकेट’ तयार झाले होते. त्यांचे थेट कर्नाटकातील बंदीपूर आणि तमिळनाडूतील मदुमलाई जंगलासह म्हैसूर परिसरातील राखीव क्षेत्राबाहेरील चंदनाची तोड करणाऱ्या टोळ्यांशी लागेबांधे तयार झाले होते. कर्नाटकातील म्हैसूर, चामराजनगर आणि मंड्या जिल्ह्यांत मिरजेचे कनेक्शन होतेच. आता नव्याने या क्षेत्रात मिरजेत कोण ‘पुष्पा’ तयार झाला आहे, याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा: विशाल फटेविरुध्द 129 तक्रारी! मालमत्ता विकून दिली जाणार गुंतवणूकदारांची रक्कम
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ या तमिळ चित्रपटाने सध्या धुमाकूळ घातला आहे. रक्तचंदनाची तस्करी, त्याचे सिंडिकेट, त्याची दलाली, त्यातील कोट्यवधींची उलाढाल, पोलिस कनेक्शन, महाराष्ट्र, पंजाबसह देशभरातील त्याचे दलाल यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. हा सिनेमा अजूनही हाऊसफुल्ल चालला असून, तोवर इकडे मिरजेत लाल चंदनाची अडीच कोटी रुपयांची तस्करी उघड करत पोलिसांनी मिरजेतील ‘पुष्पराज’ संपलेले नसल्याचे दाखवून दिले आहे.
हेही वाचा: लसीकरणाने मिळाला अर्थव्यवस्थेला बूस्टर
या कारवाईतील प्राथमिक माहितीनुसार हे चंदन बंगळुरातून कोल्हापूरला निघाले होते, असे सांगितले जात आहे. अर्थात, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नाके चुकवण्यासाठी हा आडमार्ग निवडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र इतक्या राजरोसपणे चंदन नेले जातेय, हेही संशयास्पद आहे. शिवाय, त्याचा मार्ग मिरजेतून निवडला गेल्यामुळे हे चंदन मिरजेत उतरवले जाणार होते का, अशी शंका यायलाही नक्कीच वाव आहे. पोलिस त्याच्या मुळाशी जातील आणि मिरजेशी कनेक्शन असेल तर नवा ‘पुष्पा’ कोण? इथे नव्याने काही लोक कर्नाटकच्या ‘सिंडिकेट’सोबत काम करत आहेत का, याचा शोध घेतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
हेही वाचा: ‘डब्लूएचओ’कडून चुकीचा नकाशा प्रसिद्ध
दुसरीकडे सध्या जिल्ह्यातील शेतात, ओढ्याकाठी, बांधावर उगवलेले चंदन चोरण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. काही किरकोळ व्यवसायाचे निमित्त करून दिवसा हे लोक फिरतात आणि चंदन झाडांची रेकी करतात. रात्रीत ही झाडे गायब झालेली असतात. चंदनाच्या झाडाचे एक निश्चित वय पूर्ण व्हावे लागते, तरच त्याचे लाकूड आणि त्यातील अर्क उपयुक्त ठरतो. अनेकदा झाड तोडले जाते. ते लहान असल्याचे लक्षात आल्यानंतर ते तसेच सोडून चोरटे निघून जातात. आपल्याकडे बांधावर उगवणाऱ्या सामान्य चंदनाचे पाच-सात फुटांचे झाड तोडल्यानंतर त्यातील फारसे मूल्य नसलेला ९० टक्के भाग तेथेच काढून टाकला जातो आणि महागडा विकला जाणारा त्यातील गाभा घेतला जातो. चंदनाच्या झाडाची खरेदी करायला काही लोक आले, तर त्याच दिवशी व्यवहार करा, अन्यथा रात्रीत ते झाड चोरीला जाते, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्याची प्रचंड धास्ती आजही कायम आहे. गावागावांत फिरणाऱ्या अशा छोट्या चोरट्यांचा मिरजेतील ‘पुष्पा’ कोण आणि ही साखळी कोणत्या ‘मुरुगन’पर्यंत आहे, याची माहिती चर्चेत असते. ती पोलिस दप्तरी येणार का,हाच मुख्य मुद्दा आहे.
हेही वाचा: देशात रुग्णसंख्येत मोठी घट; १.६७ लाख नवे रुग्ण
पोलिस अधीक्षकांचा बंगलाही सुटला नाही
सांगलीतील पोलिस मुख्यालयातील पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारापर्यंत चंदन तस्करांची मजल गेली. तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या बंगल्यामागील चंदनाची झाडे चोरण्यासाठी रात्री टोळी दाखल झाली. झाडे कापत असताना आवाज झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तस्कर पोलिसांवर हल्ला करून पळून गेले. इथे पोलिस अधीक्षकांचा बंगला सुरक्षित नसेल, तर चंदनाची शेती करण्याचे धाडस कोण करेल?
गृहमंत्र्यांची भेट अन्...
मिरजेत चंदन तस्करीच्या अनेक गुन्ह्यांत नाव असलेल्या एका व्यक्तीच्या घरी तत्कालीन गृहमंत्र्यांनी भेट दिली होती. त्यानंतर तो राज्यभर विषय गाजला होता. चंदन तस्करी आणि मिरजेचे राजकारण यांचेही नेहमी उभे-आडवे धागे राहिले आहेत.
Web Title: Who Is Miraj Pushpa Sandalwood Was Once Main Center Of Smuggling
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..