अख्खं गावच विकतं "केवायसी'!

सूर्यकांत वरकड
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

उत्तर प्रदेशातील एका गावाने चक्क "केवायसी' कागदपत्रे (ओळख पटविण्याची मूळ कागदपत्रे) परदेशी व्यक्तींना विकून टाकली आहेत. त्या व्यक्ती "केवायसी'चा उपयोग करून बनावट बॅंकखाती उघडत आहेत. या खात्यांतून थेट बॅंकेच्याच गंगाजळीवर डल्लाही मारीत आहेत.

नगर : भारतात कोण काय विकील आणि कोण काय खरेदी करील, याचा नेम नाही. उत्तर प्रदेशातील एका गावाने चक्क "केवायसी' कागदपत्रे (ओळख पटविण्याची मूळ कागदपत्रे) परदेशी व्यक्तींना विकून टाकली आहेत. त्या व्यक्ती "केवायसी'चा उपयोग करून बनावट बॅंकखाती उघडत आहेत. या खात्यांतून थेट बॅंकेच्याच गंगाजळीवर डल्लाही मारीत आहेत. 

नगरमधील एका सहकारी बॅंकेचे खाते हॅक करून पैसे चोरल्याचे नुकतेच उघड झाले आहे. त्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीची चौकशी केली असता वरील अजब माहिती समोर आली. महाराष्ट्रातील अनेक गुन्ह्यांचे धागेदोरे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यांपर्यंत पोचले आहेत. 

यापूर्वी नगरसह अन्य जिल्ह्यांमध्ये गावठी पिस्तुलांचा पुरवठा मध्य प्रदेशातून होत होता. त्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले. नगर पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. काळ बदलला तसे गुन्हेगारीचे स्वरूप बदलले. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले. बॅंक खात्यातून अचानक रोकड गायब झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे सायबर गुन्ह्याची आकडेवारी वाढत गेली. सायबर पोलिस ठाण्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दाखल होऊ लागले. 

नगर सायबर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी, सर्व्हर हॅक करून राष्ट्रीयीकृत बॅंकेतील, सहकारी बॅंकेच्या चालू खात्यातून लाखोंची रोकड लांबविल्याच्या गुन्ह्यात एकाला अटक केली. सहकारी बॅंकेच्या ज्या खात्यातून पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग झाले, ती सर्व खाती बनावट कादपत्रांच्या आधारे उघडण्यात आल्याचे तपासात समोर आले. 
उत्तर प्रदेशातील धंतिया (जि. बरेली) या गावामध्ये वृद्ध व्यक्ती अथवा मृत व्यक्तीची कागदपत्रे विकण्याचा व्यवसायच आहे. 

अशी होते विक्री 

नायजेरिया देशातील हॅकरना धंतिया गावातील लोक आपली कागदपत्रे केवळ पाच ते दहा हजार रुपयांमध्ये विकतात. बॅंक खाते तयार होईपर्यंत ते नायजेरियन व्यक्तीला सहकार्य करतात. खाते सुरू झाल्यानंतर नेटबॅंकिंगचे पासवर्ड व बॅंकेचे पासबुक, एटीएम कार्ड नायजेरियन व्यक्‍तीला देऊन गायब होतात. मग ती नायजेरियन व्यक्ती संबंधित खात्याचा गैरवापर करते. अन्य खात्यांतून बनावट खात्यावर रोकड वर्ग करतात आणि एटीएमद्वारे ती रक्कम काढून घेतात. विशेष म्हणजे धंतिया गावातील 80 टक्के लोक हा "केवायसी' विकण्याचा व्यवसाय करतात. 

दिल्लीजवळ गुन्हेगारांचे अड्डे! 

विविध वेबसाइटवर गिफ्ट व अन्य आमिषे दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील बहुतांश आरोपी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद (उत्तर प्रदेश), भरतपूर (राजस्थान) आदी शहरांमध्ये वास्तव्यास असल्याचे तपासात समोर आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Whole village sells "KYC"!