नादुरुस्त एसटी दुर्गम भागात का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

टाकवे बुद्रुक - तळेगाव आगारातून सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रवासी घेऊन निघालेली तळेगाव-सावळा एसटी कान्हे फाट्यावरील महिंद्रा कंपनीजवळ बंद पडली. पुढील प्रवासासाठी आगारप्रमुखांनी दुसरी बस पाठवली. ही बसही फळणे फाट्यावरून भोयरेत पोचली आणि बंद पडली. त्यामुळे सावळा, माळेगाव, कुणे, अनसुटे, इंगळूण, पिचडवाडी, किवळे या गावांतील प्रवाशांना धो धो कोसळणाऱ्या पावसात छत्र्या, रेनकोट सांभाळीत पायपीट करावी लागली. 

एसटी बंद पडल्याने पायपीट करावी लागण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. पावसाळ्यातच नव्हे, तर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही हीच बोंब असते. राज्य परिवहन महामंडळ दुर्गम भागात नादुरुस्त बस का पाठवते, अशी संतप्त प्रतिक्रिया या दोन्ही बसमधील प्रवाशांनी व्यक्त केली. 

सकाळी लवकरच घराबाहेर पडल्याने लागलेली भूक त्यातच बस बंद पडल्याने करावी लागलेली पायपीट, यामुळे प्रवाशांनी महामंडळाच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. रस्त्यावर ओरडून काय उपयोग. इथे ना वरिष्ठ अधिकारी ना लोकप्रतिनिधी. बसच्या वाहक, चालकांनी आमचे म्हणणे ऐकून काय फायदा. घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतरही दुसऱ्या दिवशी त्यांना नादुरुस्त बस घेऊनच निघावे लागते. मावळच्या आमसभेतही सर्व नागरिक महामंडळाच्या कारभाराबाबत जाब विचारतात; पण अधिकारी सारवासारवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. मात्र, वारंवार बस बंद पडल्याने पायपीट करावी लागण्याचा नागरिकांचा त्रास वाढतच आहे. 

Web Title: why Bad ST in rural area