वाय-फाय शाळा दिवास्वप्न

युवराज पाटील
मंगळवार, 10 जुलै 2018

शिरोली पुलाची - शिक्षण विभागाला सातत्याने कुठली ना कुठली माहिती पुरविण्यासाठी सायबर कॅफेमध्ये तळ ठोकावा लागणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सर्व शाळा वाय-फायने जोडण्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेने दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील 35 टक्के शाळांमध्ये संगणक नाही, पंधरा टक्के शाळांमध्ये वीजही नाही. त्यामुळे वाय-फायचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार का, असा सवाल शिक्षकांकडूनच उपस्थित होत आहे.

राज्यातील हजारो शिक्षकांच्या मागे "तंत्रस्नेही' अशी ओळख तयार झाली आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकापलीकडील माहिती देण्यासाठी पुस्तकांवर क्‍यूआर कोड छापण्याचा आणि त्याला ऍप जोडून पूरक माहिती देण्याचा उपक्रमही राबविण्यात आला आहे. त्याच्या जोडीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व शाळा वाय-फायने जोडण्याची घोषणा केली. मात्र, मुळात राज्यातील बहुतांश शाळांमध्ये अद्यापही संगणक आणि वीज जोडणीही नाही. अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसताना वाय-फायची स्वप्ने दाखविणे म्हणजे शिक्षक व विद्यार्थ्यांना गाजर दाखविण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया शिक्षण विभागातून व्यक्त होत आहे. वाय-फायपेक्षा व्यावसायिक दराने वीजबिलाची आकारणी बंद करावी, अशी मागणीही शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

शाळांना मोठी स्वप्ने दाखविण्यापेक्षा मूलभूत सुविधा द्याव्यात आणि शिक्षकांना शिकविण्यासाठी वेळ देणे अधिक आवश्‍यक आहे.
- सुरेश पाटील, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, शिरोली

राज्यातील शिक्षण...
1.25 लाख - एकूण शाळा
5 लाख - शिक्षक
2.25 कोटी - विद्यार्थी संख्या
35 टक्के - संगणक नाहीत अशा शाळा
15 टक्के - वीज नाही अशा शाळा

Web Title: wi-fi school issue