पतीचे तिघांवर वार; पत्नीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

सातारा - करंजे येथील एकाने ठेकेदार, घरमालक व शेजारच्या एका महिलेवर चाकूहल्ला करून पत्नीला मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी घडली. संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकारामुळे मानसिक तणावात गेलेल्या त्याच्या पत्नीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. या सर्व घटनाक्रमामुळे काल रात्रीपासून करंजे परिसरात खबळबळ उडाली आहे. 

सातारा - करंजे येथील एकाने ठेकेदार, घरमालक व शेजारच्या एका महिलेवर चाकूहल्ला करून पत्नीला मारहाण केल्याची घटना काल सायंकाळी घडली. संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकारामुळे मानसिक तणावात गेलेल्या त्याच्या पत्नीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. या सर्व घटनाक्रमामुळे काल रात्रीपासून करंजे परिसरात खबळबळ उडाली आहे. 

राजू दीपक साळुंखे (वय 45, रा. 434, करंजे) असे अटक केलेल्या संशयित बांधकाम कामगाराचे नाव आहे. त्याच्या हल्ल्यात ठेकेदार रहिनाथ श्रीधर लोणकर (रा. बाबर कॉलनी, करंजे), घर मालक अंजना शंकर कदम व शेजारी राहणारी महिला शालन गोविंदराव लिंगाडे हे जखमी झाले आहेत. अनिता राजू साळुंखे (वय 35, रा. करंजे) असे आत्महत्या केलेल्या त्याच्या पत्नीचे नाव आहे. 

राजू याचा पुणे जिल्ह्यातील पौंड येथे राहात असताना अनिता यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर गेली अकरा वर्षे ते साताऱ्यात राहात आहेत. त्यापैकी गेली चार वर्षे ते करंजे येथील घरात भाड्याने राहतात. सध्या तो रहिनाथ यांच्याकडे कामाला होता. काल सायंकाळी साडेसातला रहिनाथ हे बाबर कॉलनी येथून करंजे परिसरात निघाले होते. त्यांच्या घराच्या थोड्या अंतरावर असलेल्या विहिरीजवळ राजूने त्यांना थांबविले. तो नशेत होता. घराजवळ सोडण्याची विनंती त्याने त्यांना केली. त्यानुसार त्यांनी त्याला दुचाकीवर घेतले. मात्र, थोड्याच अंतरावर त्याने गाडी थांबविण्यास सांगितले. खाली उतरल्यावर पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी एक हजार रुपये द्या, असे तो रहिनाथ यांना म्हणाला. तो मद्य प्यायलेला असल्याने त्यांनी उद्या सकाळी पैसे देतो, असे सांगितले. त्यामुळे चिडून राजूने त्याच्या जवळच्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर तो पळून घरी गेला. 

घरी गेल्यावर त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली. तिच्यावर चाकूने वार करणार तोच घरमालक अंजना व शेजारी राहणाऱ्या शालन भांडण सोडविण्यास गेल्या. झटापटीत राजूने त्यांच्यावरही वार केले. या गोंधळामुळे शेजारी राहणारे लोक गोळा होऊ लागले. त्यामुळे राजूने तेथून पळ काढला. परिसरातील नागरिक त्याचा पाठलाग करत होते. त्याच वेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याची पोलिस गाडी तेथे आली. त्यांनी पाठलाग करून राजूला ताब्यात घेतले. रहिनाथ यांच्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, राजूला अटक झाल्यानंतर रात्री अनिता त्याला पाहण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. घरी परतल्यावर सात वर्षांच्या मुलासोबत त्या झोपल्या. सकाळी मुलाला जाग आली. त्या वेळी अनिता यांनी गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले. मुलाने गोंधळ केल्यानंतर स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. 

मृत्यूबाबत कोणाला कळवायचे? 
अनिता यांच्या नातेवाइकांची माहिती पोलिसांना मिळाली नव्हती, तसेच राजूही त्याच्या नातेवाइकांबाबत काही माहिती पोलिसांना देत नव्हता. त्यामुळे अनिता यांच्या मृत्यूबाबत कोणाला कळवायचे, असा प्रश्‍न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

Web Title: wife commits suicide