सेवानिवृत्त शिक्षकाकडून पत्नीचा खून

सेवानिवृत्त शिक्षकाकडून पत्नीचा खून

इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील अशोकनगरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाने घरगुती  कारणावरून पत्नीच्या डोक्‍यात जड वस्तू घालून खून केला. रेणुका तुकाराम कुटे (वय ५०, मूळ गाव गंगादेवी, ता. आष्टी, जि. बीड, सध्या रा. साखराळे) असे मृत महिलेचे नाव आहे. काल दुपारी बारा वाजता हा प्रकार उघडकीस आला. खून करून पती तुकाराम विठोबा कुटे पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. या बाबत घरमालक अजय अरुण पाटील  यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात वर्दी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः पाटील यांच्या घरात तुकाराम कुटे दोन वर्षांपासून पत्नीसह भाडेतत्त्वावर राहात होता. या दाम्पत्यात वारंवार भांडणे होत असत. दिवाळीनंतर दोघेही मुलाच्या लग्नासाठी गावाकडे गेले. त्यानंतर ते शुक्रवारी (ता.८) इस्लामपूर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास आले. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद  सुरू झाला. रात्री साडेआठच्या सुमारास तुकाराम  खोलीला कुलूप लावून सामानासह निघून जाताना घरमालक अजय पाटील यांचे आजोबा आनंदराव पाटील यांना दिसला. लगेच येतो, असे सांगून तो निघून गेला.  तो आज बारापर्यंत परतला नव्हता. तुकाराम घराला कुलूप लाऊन जाताना एकटाच होता;  पत्नी नव्हती. 

त्यामुळे आनंदराव पाटील यांना संशय आला. त्यांनी नातू अजयला हा प्रकार सांगून खोलीचे कुलूप कापायला लावले. आत जाऊन पाहिले असता रेणुका रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांनी रेणुका यांच्या तोंडावर पाणी मारले व डॉक्‍टरांना बोलवले. डॉक्‍टरांनी तपासणी करून त्या मृत झाल्याचे सांगितले.

तिसरे लग्न अन्‌ नावही खोटे
तुकाराम कुटे याची रेणुका तिसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरा विवाह करून आलेली पत्नी त्याला सोडून गेल्याची चर्चा आज घटनास्थळी होती. तुकाराम दोन वर्षे साखराळे येथे दत्तात्रय कुटे या खोट्या नावाने राहात आहे. आज खुनाच्या घटनेनंतर तपासादरम्यान त्याच्याकडील कागदपत्रावरून त्याचे नाव तुकाराम असल्याचे स्पष्ट झाले.

श्‍वान परिसरातच घुटमळले...
रेणुका कुटे यांचा खून झाल्याचे उघड झाल्यानंतर हल्लेखोराचा तपास करण्यासाठी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले; परंतु साखर कारखान्याच्या गेटकेन ऑफिसजवळील बसथांब्याजवळ श्‍वान घुटमळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com