अजब ! राधानगरी, तिलारी जंगलातील ट्रॅप कॅमेरेच चोरीस

ओंकार धर्माधिकारी
रविवार, 8 डिसेंबर 2019

राधानगरी अभयारण्य आणि तिलारी येथील राखीव जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात. संह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कर्नाटक, गोवा येथून तिलारी किंवा राधानगरी येथील जंगलात वाघ येण्याची शक्‍यता असते.

कोल्हापूर - राधानगरी, तिलारी येथील जंगलांमध्ये वन्य जीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वाघाचे अस्तित्व शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र, राधानगरी येथील जंगलातून १५ तर तिलारी येथून ४ कॅमेरे चोरीस गेले आहेत. याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग आणि राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे. शिकारी किंवा ग्रामस्थांनी हे कॅमेरे काढून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कॅमेरे नसल्याने वन्य जीवांच्या संरक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. 

राधानगरी अभयारण्य आणि तिलारी येथील राखीव जंगलामध्ये विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात. संह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कर्नाटक, गोवा येथून तिलारी किंवा राधानगरी येथील जंगलात वाघ येण्याची शक्‍यता असते. काही वेळा येथे वाघांचे अस्तित्वही आढळून आले आहे. त्यामुळे पश्‍चिम घाटातील हा जंगल परिसर वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. 

हेही वाचा - अरेच्चा ! बेळगाव बाजारपेठेत कांदा दरात घट; कसे काय? 

कॅमेऱ्याची किंमत सुमारे १५ ते २० हजार

म्हणूनच येथील वन्य जीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येतात. या कॅमेऱ्याची किंमत सुमारे १५ ते २० हजार इतकी असते. दिवसा रंगीत तर रात्री कृष्णधवल चित्रीकरण यामध्ये होते. वन्य जीवांबरोबर या जंगलामधील वाघांचे अस्तित्व टिपण्यासाठी हे कॅमेरे बसवले जातात. कॅमेरे बसवण्यापूर्वी या परिसराचे जी.एस.आय. सर्वेक्षण केले जाते. 

राधानगरीतील १५, तिलारीतील ४ कॅमेरे चोरीस

त्यानंतर प्रत्यक्ष जंगलात पाणवठ्याच्या जागा, वन्य जीवांच्या पायवाटा, विशिष्ट प्राण्यांचे अधिवास या सर्व बाबींचा अभ्यास आणि निरीक्षण करून मगच हे कॅमेरे बसवले जातात. मात्र, जंगलात अवैधपणे प्रवेश करणारे, शिकारी हे कॅमेरे काढून घेतात. काही वेळा ग्रामस्थही गैरसमजुतीमधून कॅमेरे काढतात. तर काही वेळा या कॅमेऱ्यांची चक्क चोरीही केली जाते. राधानगरी जंगलातील १५ तर तिलारी मधील ४ कॅमेरे चोरीस गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याबाबतची तक्रारही संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 

हेही वाचा - दुध उत्पादकांसाठी खुशखबर; अकरा डिंसेबरपासून खरेदी दरात वाढ 

संबंधितावर होणार कारवाई

जंगलातील कॅमेरे चोरीस जाण्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असेल तर त्याचा गांभीर्याने शोध घेतला जाईल. ग्रामस्थ किंवा स्थानिक लोक असतील तर तपास करणे शक्‍य आहे. स्थानिक पोलिस याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करतील. 
- डॉ. अभिनव देशमुख, 
पोलिस अधीक्षक.

ट्रॅप कॅमेरे यासाठी...

  •  वाघाचे अस्तित्व शोधणे
  •  वन्य जीवांच्या हालचाली पाहण्यासाठी अभ्यासकांना उपयोगी. 
  •  वन्यजीव गणना करणे.
  •  अवैधपणे जंगलात येणारे, शिकाऱ्यांच्या चित्रीकरणासाठी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wild Life Trap Camera Robbery In Radhanagari, Tilari Forest