
कोल्हापूर - शहरातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. सर्वच पातळ्यांवर प्रशासन कोंडी फोडण्याचे प्रयत्न करीत आहे; पण शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी फक्त वाहतूक पोलिसांचीच नाही, तर नागरिकांचीही काही जबाबदारी आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी ‘सकाळ’ने शहरातील वाहतूक कोंडीचे स्पॉट रिपोर्टिंग करत आढावा घेतला आहे.
उद्यमनगरातील सकाळ कार्यालयापासून दुपारी एक वाजता सुरवात केली. बागल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या गाड्या रस्त्यातच लावल्याने दुचाकींना त्रास सहन करावा लागत होता. बागल चौकात टेंपोवाला वाटेतच गाडी लावून कुठे गायब झाला होता. बी. टी. कॉलेज रस्त्यावर मोटार लावल्याने बराच काळ वाहतूक खोळंबली, जसे-जसे पुढे जाऊ गेलो, तसतसे वाहतूक कोंडीचे प्रश्न अधिकच गडद होत गेले.
बी. टी. कॉलेजजवळ मोठ्या गाड्यांचे मालक चक्क वाटेत गाडी लावून कुणाशी तरी बोलत उभे होते. त्यामुळे नागरिकांनी किती त्रास सहन करायचा, हे ठळक होते. काही दुचाकीवाले तर मोक्याच्या ठिकाणी तिब्बल सीट प्रवास करत होते. मध्यवर्ती बस स्थानकाच्या दिशेने जाताना जेम्सस्टोनसमोर हातगाड्या आणि रस्त्यावर भाजी विक्रेत्यांमुळे वाहनांची गर्दी होती.
‘सकाळ’ मध्ये रिक्षा वाहतुकीसंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी रिक्षा बुलाव डाव बंद केला; परंतु आता नव्याने महालक्ष्मी चेंबर्सच्या बाजूला रिक्षा थांबा सुरू होताना दिसतो. दिवसाही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. दाभोळकर कॉर्नर येथे सिग्लनच्या चारी बाजूला बघितले तर आधी पुढे कोण जातो, ही जणू शर्यतच लागलेली दिसते. कारण कोण झेब्रा क्रॉसिंग पट्ट्यावर येऊन थांबतो, तर कुणी डाव्याबाजूला जाणाऱ्या मार्गावर येऊन थांबतो, अशीच परिस्थिती होती.
नियम सांगण्याची गरज
ताराराणी चौकात झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेले होमगार्ड वाहतूक व्यवस्थित हाताळत होते, परंतु नागरिकांना झेब्रा क्रॉसिंगवरून कसे जावे, हे सांगण्यात कुचराई करत होते. वास्तविक त्यांनी नागरिकांना पादचाऱ्यांचे नियम सांगणे गरजेचे आहे, पण तसे होत नसल्याचे दिसले.
सीपीआर चौकात जाताना वीज नसल्याने वाहतूक पोलिस सुरळीत वाहतूक करत होते. सीपीआरसमोर दोन्ही बाजूला असलेल्या पार्किंग आणि वाहतूक कोंडी यामुळे रुग्णवाहिकेला फटका बसला. करवीर तहसील कार्यालयासमोर तर वाहनांची कोंडीच कोंडी होती. त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू होती. पोलिस रस्त्यात मोटार लावणाऱ्या वाहनधारकांना विनंती करत होते. काहीजण त्यांना जुमानत नव्हते.
विरुद्ध दिशेने जाण्याने अपघात
ताराराणी पुतळ्याला वळसा घालून पुन्हा सीबीएसकडे कूच केले. नियम धाब्यावर बसवून दुचाकीवाले सीबीएस ते पंचशील हॉटेल प्रवास करत होते. त्यामुळे यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. पुढे सीबीएसच्या (विरुद्ध दिशेने) समोरून येणाऱ्या प्रवाशांना स्थानकाकडे येण्यास त्रास सहन करावा लागत होता. त्या ठिकाणी छोटा उड्डाणपूल व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.