कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य निघाले सहलीला; कारण काय ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने सदस्यांना व्हीप लावला. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भाजपने एकेका सदस्याशी संपर्क सुरू केला आहे.

कोल्हापूर - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी २ जानेवारीस निवडणूक होत असून, आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या घडामोडींना वेग आला आहे. याचाच भाग म्हणून नेत्यांच्या सूचनेनंतर शासकीय विश्रामगृहात दोन्ही पक्षांच्या सदस्यांची बैठक झाली आणि राष्ट्रवादीने व्हीप जारी केला. अपक्षांसह २६ सदस्यांपैकी २२ सदस्यांनी बैठकीला हजेरी लावत शक्तिप्रदर्शन केले, तर उर्वरित चार सदस्य विविध कारणांस्तव बैठकीस अनुपस्थित होते. हे सदस्यही सहलीसाठी गुरुवारी (ता.२६) उर्वरित सदस्यांसोबत रवाना होतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिली. दरम्यान, फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने सदस्यांना व्हीप लावला. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भाजपने एकेका सदस्याशी संपर्क सुरू केला आहे.

कोणत्याही परिस्थिती सत्ता टिकवण्यासाठी भाजपचे नेते झटत आहेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त आहेत. त्यामुळे आघाडीत अस्वस्थता होती. याबाबत नेत्यांकडेही सदस्यांनी भावना बोलून दाखवल्यावर रविवारी आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत सूचना दिल्या. त्यांच्या सूचनेनंतरच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी  शासकीय विश्रामगृहात दोन्ही पक्षांच्या सदस्यांची बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याबाबत त्यांनी सदस्यांना आश्‍वस्त केले. तसेच गुरुवारी सहलीस जाण्यासाठी तयारी करावी, अशा सूचनाही त्यांनी सदस्यांना दिल्या.

हेही वाचा - धक्कादायक ! मित्राला फॅक्टरी काढण्यासाठी केलेली मदत बेतली जिवावर 

सहीस जीवन पाटील यांचा विरोध

सदस्यांची बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे गटनेते युवराज पाटील यांनी व्हीपचा कागद सहीसाठी दिला. राष्ट्रवादीच्या ११ पैकी १० सदस्यांनी त्यावर सही केली. जीवन पाटील यांनी मात्र सही करण्यास विरोध केला. कोणतीही चर्चा करण्यापूर्वी व्हीप लावणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मागील पावणेतीन वर्षांत पक्षाने कसे डावलले, याचा पाढाही त्यांनी वाचल्याचे सदस्यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांत कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून, पुढील भूमिका जाहीर करणार आहे. पाठिंब्यापूर्वी काही अटी-शर्ती घालणार असून, त्याबाबत निर्णय झाल्यानंतरच पाठिंब्याचा विचार करू, असे जीवन पाटील यांनी सांगितले.

देसाई, बल्लाळ यांच्याशी चर्चा

बैठकीस काँग्रेसच्या रेश्‍मा देसाई, बजरंग पाटील, सचिन बल्लाळ व राष्ट्रवादीच्या परवीन पटेल अनुपस्थित होत्या. गतवेळी अध्यक्ष पदाच्या निवडीत काँग्रेसच्या सदस्या रेश्‍मा राहुल देसाई या अनुपस्थित होत्या. पक्षविरोधी भूमिका घेऊनही त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. यावेळी मात्र देसाई यांनी पक्षासोबत राहण्यासाठी दबाव वाढला आहे. काँग्रेसचे गटनेते व माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी राहुल देसाई यांच्यासोबत चर्चा केली. चर्चा सकारात्मक असून, रेश्‍मा देसाई या काँग्रेससोबत असतील, असे श्री. आपटे यांनी सांगितले. तसेच चंदगड येथील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ हेदेखील पक्षासोबत आहेत. तेही सहलीसाठी सर्व सदस्यांसोबत येणार असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा - नव्या वर्षात अकरा साखर कारखान्यांची रणधुमाळी 

अंदमान निकोबार, म्हैसूर-उटीला सहल

दोन्ही पक्षांच्या सदस्यांना सहलीवर पाठवण्यात येणार आहे. काही सदस्यांनी तर परदेशी सहलीची मागणी केली आहे, मात्र अनेक सदस्यांचे पासपोर्ट नाहीत. त्यामुळे सर्वच सदस्यांना एकत्र सहलीस पाठवले जाणार आहे. अंदमान निकोबार व म्हैसूर-उटी येथे ही सहल नेण्याचे नियोजन आहे. गुरुवारी सकाळी ही सहल जाण्याची शक्‍यता आहे. या सहलीत शिवसेनेचे सदस्यही घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

शिवसेनेची उद्या बैठक

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी महाविकासआघाडी सत्तेत आहे. हाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही असण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठका झाल्या असून, बुधवारी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर बैठक घेणार आहेत. शिवसेनेची सदस्य संख्या १० असून, यातील तीन सदस्य आघाडीसोबत आहेत, तर ७ सदस्य भाजपसोबत आहेत. निवडीवेळी शिवसेनेचे सर्व सदस्य एकाच बाजूला आणि तेही महाविकासआघाडी सोबत राहतील, अशी शक्‍यता शिवसेनेतून वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी संख्याबळ

काँग्रेस (१४), राष्ट्रवादी (११), शाहू आघाडी भुदरगड (२), शिवसेना मंडलिक, पाटील गट(३) अशी ३० सदस्य संख्या आहे. आता अपक्ष असलेल्या रसिका अमर पाटील यांनी या आघाडीला पाठिंबा दिल्याने ही संख्या ३१ पर्यंत गेली आहे, तर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला विरोध असून, ते आता महाविकासआघाडीसोबत जाण्याची शक्‍यता आहे. संघटनेचे २ सदस्य आल्यास महाविकास आघाडीची सदस्य संख्या ३२ पर्यंत जाणार आहे. आणखी दोन सदस्य मिळाल्यास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे. चंदगड विकास आघाडीचे दोन सदस्य असून, त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. तसेच शिवसेनेचा जो गट भाजपसोबत  आहे, त्यांचे ७ सदस्य आहेत. यातील सहा सदस्य घेतल्यास आघाडीचे संख्याबळ ३९ होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad Member Departing For Trip Kolhapur Marathi News