सांगली महापालिका करणार व्यापाऱ्यांची रॅपीड अँटीजेन चाचणी

बलराज पवार 
Thursday, 30 July 2020

​सांगली : महापालिकेच्यावतीने सर्वच व्यापाऱ्यांची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे.

सांगली : महापालिकेच्यावतीने सर्वच व्यापाऱ्यांची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी व्यापारी एकता असोसिएशनसह विविध व्यापारी संघटनांशी चर्चा सुरु आहे. त्यांनी अनुकूलता दर्शवल्यास लॉकडाऊननंतर ही चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त नितिन कापडणीस यांनी दिली. 

महापालिका प्रशासनाने क्षेत्रातील कंटेन्मेंट झोन तसेच 50 वर्षावरील व आजारी व्यक्तींची रॅपीड अँटीजेन चाचणी सुरु केली आहे. यात लक्षणे नसलेले पण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडत आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार होत असल्याने समूह संसर्गाचा धोका टाळला जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. औरंगाबाद महापालिकेने काही दिवसांपूर्वी सर्व व्यापाऱ्यांची रॅपीड अँटीजेन चाचणी केली होती. यात मोठ्या संख्येने व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह आढळले. अशा व्यापाऱ्यांकडे नागरीकांनी खरेदी करू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांपासून होणारा संसर्गाचा धोका टळला. याच धर्तीवर सांगली महापालिकेनेही व्यापाऱ्यांची चाचणी करावी, अशी मागणी होत होती. 

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांच्यासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांच्या अँटीजेन चाचणीस असोसिएशनने अनुकूलता दर्शवली आहे. बाजारपेठ सुरु झाल्यानंतर प्रत्येक लाईनच्या व्यापाऱ्यांची दुकानात जाऊन तपासणी करावी, अशी मागणी शहा यांनी केली.

मात्र ही तपासणी आरोग्य कर्मचारी पीपीई कीट घालून करीत असल्याने हे शक्‍य नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांना विशिष्ट दिवशी, विशिष्ट ठिकाणी एकत्र बोलावून ही चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. किराणा, केशकर्तनालय, हॉटेल आदि व्यापारी संघटनांशीही चर्चा करून त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे श्री. कापडणीस यांनी स्पष्ट केले. 

अँटीजन चाचणीचा अहवाल उपलब्ध 
महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या रॅपीड अँटीजेन चाचणीबाबत नागरिकांत संभ्रम आहे. या चाचणीचा अहवाल सदोष असल्याचा दावा केला जात आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला आहे. ही चाचणी अचूक व विश्वासार्ह असल्याचे स्पष्ट केले आहे. अँटीजेन चाचणीचा अहवाल संबंधितांना दिला जात नसल्याच्याही तक्रारी आहे. मात्र महापालिकेच्या आरोग्य केंद्रात हे अहवाल आहेत. पॉझिटीव्ह व निगेटीव्ह व्यक्तीलाही त्यांनी मागणी केल्यानंतर तातडीने अहवाल दिले जाणार आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will conduct rapid antigen testing of traders