लाड यांच्या "पदवीधर'च्या तपश्‍चर्येची फलश्रुती होणार? अखेर राष्ट्रवादीकडून संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arun-Lad

 शिवारात तास धरुन काम करणारा हाडाचा कार्यकर्ता अशी अरुण लाड यांची ओळख सांगता येईल. गेली चौदा वर्षे ते पदवीधर मतदारसंघाची तयारी करीत आहेत. गतवेळी त्यांनी स्वबळावर 37 हजार मते घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपल्या तयारीची जाणिव करुन दिली. आता राष्ट्रवादीने त्यांच्या गळ्यात महाविकास आघाडीचे म्हणून उमेदवारी दिली आहे.

लाड यांच्या "पदवीधर'च्या तपश्‍चर्येची फलश्रुती होणार? अखेर राष्ट्रवादीकडून संधी

सांगली : शिवारात तास धरुन काम करणारा हाडाचा कार्यकर्ता अशी अरुण लाड यांची ओळख सांगता येईल. गेली चौदा वर्षे ते पदवीधर मतदारसंघाची तयारी करीत आहेत. गतवेळी त्यांनी स्वबळावर 37 हजार मते घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला आपल्या तयारीची जाणिव करुन दिली. आता राष्ट्रवादीने त्यांच्या गळ्यात महाविकास आघाडीचे म्हणून उमेदवारी दिली आहे. क्रांती उद्योगसमुहातील प्रत्येक संस्था त्यांनी नेटाने चालवली. राजकीय दृष्ट्या ते कायमच लो प्रोफाईल राहिले. राजकीयदृष्ट्या त्यांना आजवर फारशी संधी मिळाली नाही. मात्र त्यांचा पासंगाची मदत घेत त्यांची शिडी करीत अनेकांनी सत्ता चाखली. गेली बारा वर्षे म्हणजे जवळपास तपभर ते पदवीधर मतदारसंघात जणू तपश्‍चर्या करीत आहेत. या तपाची फलश्रुती होते हे लवकरच स्पष्ट होईल. 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचे पर्व म्हणजे एक सोनेरी पान आहे. या क्रांतीपर्वातील अग्रदूत आणि तुफान सेनेचे सेनापती असलेल्या क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेल्या अरुण लाड यांनी केवळ वडिलांच्या किर्ती न सांगता गेल्या तीन दशकाच्या सक्रीय समाजकारणात क्रांती समुहाचा वटवृक्ष उभा केला आहे. 1957 च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचे राज्यात 62 आमदार विजयी झाले. त्यात एक जी.डी.बापू होते. शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिष्ट, डाव्या विचाराची धुरा खांद्यावर घेत जीडीबापूंनी प्रदिर्घकाळ कॉंग्रेसविरोधी प्रवाहात काम करताना पक्षनिष्ठा काय असते हे दाखवून दिले. या जातीवंत निष्ठेची प्रचिती देत राष्ट्रवादीच्या पडत्या काळातही त्यांनी भाजपची आणि भाजपमध्ये गेलेल्या त्यांच्या स्नेहीजणांची अमिषे नाकारत पक्षासोबत त्यांनी निष्ठा कायम राखली. 

कामातून उभे रहायचे..कामातून बोलायचे हा त्यांचा स्वभाव आहे. राज्यभर सहकारी संस्थाचे तारु गटांगळ्या खात असतानाही क्रांती समुहातील कारखाना, डिस्टलरी, को-जनरेशन प्रकल्प, दुध संघ, बॅंक, पतसंस्था, खरेदी विक्री संघ, शिक्षण संस्था, पाणी योजना मात्र नेटाने सुरु आहेत. प्रगती करीत आहे ते लाड आणि त्यांच्या बंधू सहकाऱ्यांच्या निष्ठापुर्वक प्रयत्नांचे यश आहेत. रोज डबा बांधून सकाळी सात वाजता साखर कारखान्यात हजर राहणारा हा माणूस या मोठा पसारा असलेल्या साखर कारखान्यांसह उद्योगसमुहांचा प्रमुख आहे हे परक्‍या माणसाला सांगितल्यावरच कळेल. इतका साधेपणा आजच्या साखर सम्राटांच्या काळात विरळच. 

बीएस्सी ऍग्री पदवीधारक लाड यांनी गेल्या वीस वर्षात पदवीधर मतदारसंघातील 57 विधानसभा मतदारसंघात तरुणांचे नेटवर्क उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. गोगरीब बहुजनांचे शिक्षण हा त्यांचा नेहमीचा ध्यास आहे. सरकार शिक्षणातून अंग काढून घेत असताना ते रोखण्यासाठी पुरोगामी विचाराच्या सर्व संघटनांनी एकत्र आलं पाहिजे यासाठी त्यांचे एकांड्या शिलेदाराप्रमाणे सुरु असलेली धडपड आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात कवी कल्पनाच. मात्र यशपयशाची पर्वा न करता निष्ठेने आपलं काम केलं पाहिजे हा त्यांचा स्वभाव पाहता त्यांच्या या भूमिकेत नवं काही नाही. 
पदवीधर मतदारसंघात उतरण्याच्या त्यांच्या तयारीमागे अशी भूमिका आहे. त्याचा त्यांनी सतत उच्चार केला आहे. 
राष्ट्रवादीने त्यांना राजेश पाटील वाठारकर यांच्यासाठी थांबायला लावलं. गतनिवडणुकीवेळी त्यांना डावललं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या स्वभावाला मुरड घालत लढायचा निर्णय घेत आपली तयारी दाखवून दिली.

फडणवीस सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या एक एक शिलेदाराला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न झाले तेव्हा लाड देखील या कचाट्यातून सुटले नाहीत. एकीकडे अफाट संस्थात्मक ताकदीचा पतंगराव कदम यांचासारखा मात्तबर राजकीय विरोधक समोर असताना त्यांनी माजी आमदार संपतराव देशमुख आणि नंतर राष्ट्रवादीत पृथ्वीराज देशमुख यांना निष्ठेने साथ केली. मात्र त्यांनी पक्ष सोडल्यानंतर मात्र प्रवाहाबरोबर न जाता आघाडी धर्मही निष्ठेने पाळला. नियती अशी की ज्यांच्या पारड्यात त्यांनी आपला राजकीय ताकदीचा पासंग टाकला आणि पुढे चाल दिली त्या देशमुखांसमोरच त्यांना आता लढायचे आहे. ती त्यांच्यासाठी राजकीय आयुष्यातील सर्वात कठीन परीक्षा असेल. भाजपने संग्रामसिंह देशमुख यांनाच उमेदवारी देतांना हा रणसंग्राम पलूस-कडेगाव या मतदारसंघातील गावागावात आणून ठेवला आहे. त्याला ते कसे सामोरे जातात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. 

loading image
go to top