सरकार बदलाच्या हालचालीने सातारकरांचा तोंडचा घास लांबणार ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

हद्दवाढीचे घोंगडे पुन्हा भिजत पडणार तर नाही ना? अशी धास्ती सातारकरांना लागली आहे.

सातारा  : साताऱ्याच्या विकासाचा मुद्दा अग्रभागी ठेवून उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी भाजपचा रस्ता धरला अन्‌ लगेच सातारा पालिकेच्या हद्दवाढ, रस्त्यांच्या 50 कोटींच्या निधीचे वजन सातारकरांच्या झोळीत पडले. हा निधी पुन्हा भाजपचे सरकार आले, तर हमखास मिळणार, अशी स्थिती होती. मात्र, भाजपच विरोधी बाकावर बसण्याची चिन्हे स्पष्ट होत असल्याने हद्दवाढ, रस्त्यांसाठीच्या 50 कोटींचा निधी धास्तीच्या छायेत आहे. 
 
सातारा पालिकेच्या हद्दवाढीचा प्रदीर्घ कालावधींसाठी रखडलेला प्रश्‍न विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील सभेत सोडविला. एव्हाना शहरातील रस्त्यांसाठी 50 कोटी देणार असल्याची ग्वाहीही श्री. फडणवीस यांनी दिली. त्यानंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे, विधानसभेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी साताऱ्याच्या विकासासाठी भाजपमध्ये गेल्याचे जनतेला ठासून सांगितले. राज्यात भाजपचे सरकार येणार, अशीच चिन्हे निकालापर्यंत होती.

मतदारांनी भाजप, शिवसेना युतीला सत्तेसाठी कौलही दिला. मात्र, सत्तास्थापनेच्या तिढ्यावर भाजप, शिवसेनेत ताटातूट झाली. भाजपने विरोधात बसण्याची भूमिका सध्यातरी घेतली आहे. त्यामुळे सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीचे सरकार निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
 
राज्यातील सरकार बदलांच्या घटनांमुळे मात्र साताऱ्यात "कही खुशी, बहुत गम' अशी स्थिती दिसत आहे. आचारसंहितेपूर्वी महाजनादेश यात्रेदरम्यान श्री. फडणवीस यांनी सातारा शहराच्या हद्दवाढीच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केल्याचे जाहीर केले होते. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अधिसूचना निघणार, असे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी सांगत आहेत. मात्र, भाजपचे सरकार आले नाही तर हातातोंडाशी आलेला हा घास पुन्हा हिरावला जाणार का? हद्दवाढीचे घोंगडे पुन्हा भिजत पडणार तर नाही ना? अशी धास्ती सातारकरांना लागली आहे.
 
शहरातील दर्जेदार रस्त्यांसाठीही श्री. फडणवीस यांनी 50 कोटींच्या निधीची घोषणा केली होती. त्याची तत्काळ कार्यवाही होवून नगरविकास खात्याने रस्त्यांचे प्रस्ताव देण्यासाठी पत्र दिले होते. त्यामुळे हा निधी मिळणार, याची शाश्‍वती अधिकाऱ्यांना वाटत आहे. मात्र, भाजपचे सरकार सत्तेत न आल्यास निधी कधी मिळेल, याची चिंता आहे. 

शंभर कोटींचे आराखडे
 
साताऱ्यातील राजपथ, कर्मवीर पथासह अन्य दोन रस्त्यांसाठी यापूर्वीच 100 कोटींचे आराखडे बनविले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली. दरम्यान, भाजप सरकारने 50 कोटी जाहीर झाल्याने ही कामे लवकर मार्गी लागतील, अशी आशा होती. मात्र, सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून, ते पूर्णत्वाला गेल्याशिवाय आगामी सरकार रस्त्यांसाठी निधी देण्याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे सरकार कोणाचे होणार, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Satarakar's gets benefits due to the change of government ?