esakal | खांदेपालट काँग्रेसची फरपट थांबवेल का?
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

खांदेपालट काँग्रेसची फरपट थांबवेल का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : काँग्रेसने महापालिकेतील नेतेपदात खांदेपालट करतानाच स्वीकृत सदस्य बदलाबाबतही निर्णय केला आहे. यानिमित्त काँग्रेसचे सारे नेते एकत्र बसले हा पहिला बदल. आता ही एकी प्रत्यक्ष मैदानात किती दिसते, हे यथावकाश दिसेल. शहरासह जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसचे सध्याचे दिवस बदलायचे असतील तर नेत्यांची इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची आहे; ज्याचा अभाव पदोपदी दिसला.

महापालिकेत भाजपने काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता घेतली. २०१८ मध्ये पक्षाकडे विरोधीपक्ष नेतेपद आले. मात्र सत्तेच्या मध्यावर सत्तापालट झाल्यानंतर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर गेली आहे. इथे राष्ट्रवादीने केवळ भाजपला नव्हे तर काँग्रेसलाही धोबीपछाड मारला आहे. अर्थात या सत्तापालटातील कारनामे निःसंशय राष्ट्रवादीनेच केले. त्याचा पहिला वाटा त्यांनी घेतला हे खरेच मात्र हे काँग्रेसला का जमले नाही याचा शोध घेतला तरी काँग्रेसच्या सध्याच्या पडझडीची वेगळी कारणमीमांसा करायची गरज उरत नाही.

काँग्रेसच्या दीर्घकाळ यशस्वी राहिलेल्या ‘थंडा करके खाओ बदल’ धोरणाचा काळ आत राहिलेला नाही. त्या काळी विरोधी पक्ष काँग्रेसच्या पोटातच असायचा. त्यामुळे ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात असे काँग्रेसचे जिल्ह्यातील सूत्र असायचे. आता स्वतंत्र निशाणी घेऊन लढणारे भाजप आणि राष्ट्रवादी असे दोन तुल्यबळ स्पर्धक काँग्रेससमोर आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे जिल्हा आणि महापालिकेतील नेतृत्व दुभंगावस्थेत आहे. पक्षाला बांधून ठेवेल असा सत्तेचा गोंदही उरलेला नाही अशा कठीण काळात पक्षापुढे नव्याने बांधणीचे आव्हान आहे. त्याची सुरवात होणार असेल तर या खांदेपालटाला काही एक अर्थ असेल.

हेही वाचा: मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोप निव्‍वळ वैफल्यातून

काँग्रेसमधील दुफळीचा राष्ट्रवादीने कसा फायदा उचलला याचे ताजे उदाहरण म्हणजे महापौर-उपमहापौर निवडणुकीकडे पाहिले पाहिजे. महापौर निवडीवेळी राष्ट्रवादीने मदन पाटील गट आपल्याला विरोध करू शकतो याचा अंदाज घेत विशाल पाटील गटाला उपमहापौरपदाची संधी देऊन आपल्या बाजूला ओढले. कारण मदन पाटील गटाकडे स्वतंत्रपणे पालिकेचे राजकारण करू शकतील अशी अनुभवींची फौज आहे. जयंत पाटील यांनी त्यावेळी नेहमी विरोधाच्या पवित्र्यात असलेल्या विशाल पाटील यांना हाताशी धरले. राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे राज्यपातळीवर जिल्ह्याचे नेतृत्व आले आहे. त्यामुळे सांगलीतील पक्षाच्या यशापयशाचे माप त्यांच्या पदरात पडणे अटळ आहे. मात्र त्यांनी सांगलीतील नेतेमंडळींना एका टेबलवर बसवण्यासाठी खूप वेळ घेतला हे खरेच. देर आये दुरुस्त आये ही उक्ती खरी ठरेल का हे मात्र आगामी मैदानातील निकालच सांगतील.

अनुभव कामी यावा !

मेंढे-नाईक यांना अनुभवी म्हणून संधी देताना काँग्रेस नेते मंडळीनी सांगली-मिरज असा समतोल साधण्याचाही प्रयत्न केला आहे. आता ही मंडळी काँग्रेसला आक्रमक चेहरा देऊ शकतात. मात्र त्यासाठी सभागृहाबाहेर त्यांना पक्षाचे धोरण ठरवून उतरावे लागेल. दोन्ही काँग्रेस आणि भाजपमधील सर्वच कारभारी एकेमेकाच्या रेघा न् रेघा माहीत असलेले आहे. त्यातून एकोप्याने कारभार होईल मात्र त्याचे प्राधान्यक्रम लोकहितापेक्षा अन्यच असू शकतात. त्यात गटनेते म्हणून संजय मेंढे काय बदल करतील यावर काँग्रेसचा सभागृहातील कामाचा ठसा उमटेल.

loading image
go to top