शिवेंद्रसिंहराजेंविरुद्ध तुम्ही लढाल का ? पवारांची इच्छा

प्रवीण जाधव
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

साताऱ्यात आतून काम सुरू 
राजकारणाचे पत्ते लगेच उघड होत नाहीत. परंतु, आतून काम सुरूच असते. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंच्या मनातली लढत होणार का, हे येत्या काही दिवसांतच समोर येईल. 

सातारा : बालेकिल्ल्यातील बुरूज ढासळवण्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलेले काम जिव्हारी लागलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत सातारचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, असा निर्धार तीन दिवसांपूर्वी व्यक्त केला. तोच पूर्णत्वास आणण्यासाठी सर्वसामान्यांमधून मोठ्या झालेल्या व या मतदारसंघाच्या बहुतांश भागाचे प्रतिनिधित्व केलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांना त्यांनी उमेदवारीबाबत विचारणा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे साताऱ्यामध्ये बऱ्याच वर्षांनंतर राजा व विरुद्ध सामान्यांतील नेता अशी काट्याची लढत होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
पक्षाच्या स्थापनेपासून सातारा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मोदी लाटेतही या किल्ल्याला खिंडार पडले नाही. परंतु, पक्षाची सत्ता येण्याची शक्‍यता नसल्याने तसेच पर्यायाने मतदारसंघातील कामे करता येणार नाहीत, अशी भूमिका घेत शिवेंद्रसिंहराजेंनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक वर्षे अबाधित राहिलेल्या किल्ल्याला भगदाड पाडण्याचे भाजपचे मनसुबे त्यामुळे पूर्णत्वास येत चालले आहेत. शिवेंद्रसिंहराजेंची ही भूमिका शरद पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी साताऱ्यात ठाण मांडले होते. सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बालेकिल्ल्यातील पक्षांतराचे एक उदाहरण निर्माण करण्याबाबतची रणनीती आखण्यासंदर्भाने या मतदारसंघातील त्यांच्या हक्काच्या गटांशी चर्चाही केली. त्यातूनच त्यांनी सातारचा आमदार हा राष्ट्रवादीचाच असेल, असा ठाम दावाही पत्रकारांशी बोलताना केला. तसेच त्याअनुषंगाने दोन ते तीन दिवसांत खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले होते. 
सातारा पालिका निवडणुकीपूर्वी उदयनराजेंनी सातारचा पुढचा आमदार सर्वसामान्य माणूस असेल, अशी भूमिका मांडली होती. त्या वेळी या मतदारसंघात अशी काही परिस्थिती समोर येईल, याची कोणी कल्पनाही केलेली नव्हती. उदयनराजेंना पक्षाचे तिकीट नाकारले जावे, यासाठी "फिल्डिंग' लावणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंनाच पक्ष सोडून भाजपची वाट धरावी लागली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण, असा प्रश्‍न सातारा मतदारसंघात उभा राहिला आहे. ते कोडे शशिकांत शिंदेंच्या रूपाने सोडविण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार दिसतो आहे. स्थलांतर करूनही लोकांना आकर्षित करण्याचे व त्यांना हाताळण्याचे कसब त्यांनी कोरेगावमध्ये दाखवून दिले आहे. सध्याच्या सातारा मतदारसंघात त्यांनी पूर्वी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघाचा 60 टक्‍के भाग आहे. जावळीतील प्रत्येक गावागावात त्यांचा संपर्क आहे, माणूस ना माणूस माहिती आहे. या परिसरातील प्रश्‍नांची चांगली जाण आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी काही काळ सन ऍण्ड सैन्य कॉंग्रेसमध्ये असतानाही श्री. शिंदे यांच्या नावाची साताऱ्यातून मागणी झाली होती. तेव्हापासून सातारा शहरालाही त्यांच्याबाबत आकर्षण आहे. उदयनराजेंबरोबर त्यांचे जिल्ह्यात सर्वाधिक चांगले संबंध आहेत. जनतेची नस जाणारा नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यातूनच सातारकरांना कोण पाहिजे, हे हेरून शशिकांत शिंदेंना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीबाबत विचारणा केल्याचा सूत्रांचा दावा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will you contest againstShivindersinghraje ? Pawar's wish