'तिला' कर्करोग झाला अन् कुटुंबीयांनी असा काय निर्णय घेतला की.. I Cancer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganga Gajanan Patil

एके दिवशी निदान झालं, तिला कर्करोग झाला आहे. घरच्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता.

'तिला' कर्करोग झाला अन् कुटुंबीयांनी असा काय निर्णय घेतला की..

बेळगांव : काही कारणानं पतीचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर ती अधिकच खंबीर झाली. आपल्या दोन मुलांना घेऊन पतीचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्याचं ध्येय तिनं बाळगलं होतं. अशातच एके दिवशी निदान झाले, तिला कर्करोग (Cancer) झाला आहे. घरच्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. अतिशय हसत-खेळत जगणाऱ्या 'तिला' प्रचंड वेदना सहन कराव्या लागत होत्या. वेगवेगळे उपचार झाले, अनेक प्रयत्न झाले. मात्र, जगण्याची प्रचंड उमेद असणारी ती अचानक निघून गेली. परंतु, तिला वृक्ष रुपानं सदैव अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला आणि म्हणूनच, अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या तिच्या राखेतून वृक्ष लावण्यात आले असून जल प्रदूषण (Water Pollution) टाळण्याबरोबरच तिला सदैव सचेतन पाहण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतलाय.

बांधकाम व्यावसायिक विजय पाटील यांचे लहान बंधू कै. गजाजन यांची पत्नी कै. गंगा गजानन पाटील (Ganga Gajanan Patil) असे त्यांचे नाव आहे. पती गजानन पाटील यांचे निधन झाल्यानंतर अतिशय खंबीरपणे वाटचाल करीत असताना दुर्दैवाने कर्करोगाची लागण झाल्याने त्यांना जावं लागलं. त्यांच्या निधनानंतर मुलांना आणि एकंदर कुटुंबीयांना झालेला शोक अनावर होताच, तरीही सारेजण सावरले. त्यांच्या जाण्याला एक नवा अर्थ प्राप्त करून देण्याचा निर्णय या पाटील कुटुंबीयांनी घेतला. गुरुवारी रक्षाभरणी झाल्यानंतर त्यांच्या अस्थींचे नदीच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. मात्र, राख विसर्जित करून जलप्रदूषण करण्यापेक्षा याच पाटील कुटुंबीयांच्या वतीनं चालवल्या जात असलेल्या शांताई वृद्धाश्रमात झाडांची रोपे लावून तिची राख या झाडांमध्ये घालण्यात आली. आता या राखेच्या माध्यमातून ती झाडे उंच-उंच भरारी घेतील आणि कुटुंबीयांना सातत्यानं आपल्या घरची गंगा अस्तित्वात असल्याचं सुख मिळत राहील.

हेही वाचा: VIDEO : पाईपमधून निघू लागल्या नोटा अन् पाण्यासारखा पैसा पाहून..

यासंदर्भात कै. गंगा यांचे मोठे दीर यांचे बांधकाम व्यावसायिक विजय पाटील यांनी माहिती दिली. पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील (Bhaskarrao Pere Patil) यांच्याकडून आपण हा वसा घेतला आहे. भास्कर राव यांची आई १०५ वर्षाची असताना गेल्यानंतर त्यांनी ही तिच्या राखेचे विसर्जन न करता त्या राखेत झाडे लावण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय खरोखरच योग्य आहे. त्यामुळेच पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या पाऊलवाटेवर चालण्याचा प्रयत्न केला असून इतरांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. खरंतर कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा नाही. मात्र, प्रसिद्धीतून जास्तीत-जास्त लोक जल प्रदूषणापासून बाजूला येतील आणि वाहत्या पाण्यात मिसळलेल्या राखेचा नदी, तलाव आणि माणसांवर दुष्परिणाम सोसावा लागण्यापेक्षा ते पाणी शुद्ध राहील. त्या राखेचे खत होऊन झाडे जगतील आणि मयत व्यक्ती कायम अस्तित्वात असल्याचा आनंद मिळवता येईल, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: देशात पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक

loading image
go to top