वडिलांचा आधार नसताना त्याने केले आईच्या कष्टाचे चीज

बाबासाहेब शिंदे 
शनिवार, 23 जून 2018

आईच्या कष्टाचे चीज करण्यासाठी उमेद बाळगून चार वर्ष कठोर मेहनत करत वडिलांना आधार नसताना हलाखीच्या परिस्थितीवर मात केली आहे. उक्कडगाव येथील कृष्णा भागवत कुटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून महाराष्ट्रात त्यांनी तेरावा क्रमांक पटकावला आहे.
 

पांगरी(सोलापूर)- आईच्या कष्टाचे चीज करण्यासाठी उमेद बाळगून चार वर्ष कठोर मेहनत करत वडिलांना आधार नसताना हलाखीच्या परिस्थितीवर मात केली आहे. उक्कडगाव येथील कृष्णा भागवत कुटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून महाराष्ट्रात त्यांनी तेरावा क्रमांक पटकावला आहे.
 

गरीब मोलमजुरी कुटुंबात जन्मलेलं असल्याचे भांडवल न करता, परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठण्याची किमया उक्कडगाव (ता.बार्शी) येथील कृष्णा भागवत कुटे यांनी साधली आहे. कृष्णा भागवत कुटे यांचे मुळ कुटुंब सोनगिरी (ता.भूम) येथील रहिवाशी होते. मामाचे गाव उक्कडगाव या ठिकाणी सन 1992 ला आईवडीलसह कुटूंब दाखल झाले. याठिकाणी आल्यानंतर कृष्णा लहान असताना वडीलांचे निधन झाले. आई इंदूबाई यांच्यावर कुटूंबाची जबाबदारी पडल्यानंतर मोलमजूरी करून मुलाचे शिक्षण त्यांनी चालू ठेवले. 

प्राथमिक माध्यमिक शिक्षण उक्कडगाव येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण सर्वोदय विद्यामंदिर प्रशालेत झाले. त्यानंतर कृष्णा कुटे यांनी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण पुर्ण केले. नोकरीच्या शोधात असताना सन 2013 मध्ये 19 व्या वर्षी येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये शिपाई पदी निवड झाली. याच कालवधीत भारतीय सैन्यामध्येही निवड झाली. तसेच, राज्य राखीव पोलिस दलामध्ये ही निवड झाली होती. कारागृहाच्या शिपाईपदाचा सहा महिन्यात राजीनामा देऊन राज्यसेवा स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. पुणे येथे राहून अभ्यास करत असताना आई मोलमजूरी करून महिन्याला पाच हजार रूपये पाठवून देत होती. आईच्या कष्टाचे चीज करण्याची उमेद बाळगून चार वर्षं  कठोर मेहनत करत वडीलांचा आधार नसताना, हलाखीच्या परिस्थितीवर मात केली. कृष्णा कुटे यांनी मुख्य परिक्षेत 200 पैकी 130 गुण, तर, शारिरीक चाचणीमध्ये 100 पैकी 98 गुण, मुलाखतीमध्ये 40 पैकी 29 गुण मिळवून महाराष्ट्रात तेराव्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: Without the support of the father, he get pass PSI exam