इस्लामपुरातील कोरोना रुग्णावर उपचार होणार जलद कसे वाचा सविस्तर

धर्मवीर पाटील
Saturday, 29 August 2020

इस्लामपुरातील दोन रुग्णालये प्रशासनाने घेतली ताब्यात
प्रांताधिकाऱ्यांची माहिती; 60 रुग्णांची व्यवस्था होणार.

इस्लामपूर ( सांगली) : इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन आणि त्यांच्यावर उपचार मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करता प्रशासनाने शहरातील बस स्थानक परिसरातील दोन खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा निर्णय  घेतला. येत्या दोन दिवसात त्याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू केले जातील, या दोन रुग्णालयातून तूर्तास 50 ते 60 रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था होणार आहे. शहरातील आणखी चार रुग्णालये ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी दिली.

कोरोना आजाराचे निदान होण्यापूर्वीच संशय व्यक्त करून त्यांना शासकीय व्यवस्था असल्याच्या ठिकाणी रुग्णांना पाठवण्यात येण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे कोरोनाचे निदान होण्यापूर्वीच त्याच्यावर योग्य निदान न झाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी होत होत्या. सांगलीत ज्या पद्धतीने काही खासगी रुग्णालये प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत, त्यानुसार इस्लामपूरात देखील निर्णय व्हावा, अशी तालुका संघर्ष समितीची मागणी होती. त्यानुसार नागेश पाटील यांनी शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे.

हेही वाचा- मेडिक्लेम पॉलिसी घेताय मग ही घ्या दक्षता

शहरातील मोठ्या क्षमतेची सहा रुग्णालये निश्चित करून ती ताब्यात घेतली जाणार आहेत. रुग्णांची हेळसांड होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. ज्या लोकांची उपचारासाठी खर्च घालण्याची आर्थिक क्षमता आहे अशांना या ठिकाणी उपचार घेता येईल. फक्त त्यांना केली जाणारी आकारणी ही शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारावरच केली जाईल. या बिलांवर शासनाचे लक्ष असेल, असे नागेश पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, "आज दोन रुग्णालयांना तशा सूचना केल्या आहेत, अन्य चार रुग्णालयांची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. सर्व डॉक्टरांशी चर्चा करूनच निर्णय घेतले आहेत. कोणत्याही कोरोना किंवा कोरोना संशयित रुग्णांचे नुकसान होणार नाही, याबाबत प्रशासन दक्ष राहील. त्यासाठी स्वतंत्र पथक नेमले आहे. दुर्लक्ष, टाळाटाळ किंवा हेळसांड झाल्यास रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून दिला जाईल."

हेही वाचा-स्टार्टअप ः मास्कमुळे मिळाली सुरक्षा अन्‌ रोजगारही....

"खासगी रुग्णालयाकडून कोव्हिड आणि कोव्हिड संशयित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोठे हाल सुरू होते, प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे."
- शाकिर तांबोळी, वाळवा तालुका संघर्ष समिती.

"कोरोनाच्या महामारीत शासनाकडून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याची गरज होती, प्रशासनाने त्याबाबत हयगय करू नये."
- बी. जी. पाटील, बळीराजा शेतकरी संघटना.

"प्रशासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यानिमित्ताने रुग्णांना दिलासा मिळेल. प्रशासनाला व्यवस्था राबविताना मनुष्यबळ लागल्यास युवक मदत करण्यास तत्पर आहेत, त्यांनी आवाहन करावे."
- उमेश कुरळपकर, मराठा आरक्षण संघर्ष समिती

 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wo hospitals in Islampur seized by the administration Prefecture information 60 patients will be arranged