
नगर : "सख्खा भाऊ, पक्का वैरी' अशी एक जुनी म्हण आहे. मात्र, सावत्र भाऊही "ती'चा वैरीच निघाला. वडिलांनी मुलीच्या नावावर काही मिळकत केली होती; पण त्यावर सावत्र भावाचा डोळा होता. त्यासाठी बहिणीलाच (सावत्र) भरल्या संसारातून उठविण्याचा जणू विडाच त्याने उचलला. अखेर पीडित विवाहिता "दिलासा सेल'मध्ये आली नि सावत्र भावाचे सगळे मनसुबे धुळीस मिळाले. शेवट गोड झाला. पीडितेचा संसार सुखाचा झाला..!
ही कथा आहे शेवगाव तालुक्यातील सरिताची (नाव बदललेले आहे). गावातीलच एका ट्रकचालकाबरोबर तिचे लग्न झाले. सरिताला एक सावत्र भाऊ आहे. सासरी छळ होत असल्याने तिचा हा भाऊ तिला "दिलासा सेल'मध्ये घेऊन आला. तेथे कर्मचाऱ्यांनी तिचे समुपदेशन करण्यास सुरवात केली; पण सरिता काहीच बोलत नव्हती. सगळे काही हा भाऊच सांगत होता. पती, सासरचे लोक तिला खूप त्रास देत असल्याचे त्याचे म्हणणे होते; पण सरिता काहीच बोलायला तयार नव्हती. पुन्हा एके दिवशी भावासोबत ती "दिलासा सेल'मध्ये आली. त्या वेळी एक महिला पोलिस एका पीडित मुलीची आस्थेवाईकपणे चौकशी करीत असल्याचे तिने पाहिले आणि तिचा आत्मविश्वास दुणावला. संयमाचा बांध फुटला. महिला कॉन्स्टेबलच्या गळ्यात पडून ती रडू लागली आणि खऱ्या प्रकरणाला वाचा फुटली.
ती सांगू लागली, ""वडिलांना दोन बायका. वडिलांनी माझ्या आणि आईच्या नावे 15 एकर शेती केली. त्यात डाळिंबाची बाग आहे. मी सासरी चांगली नांदत होते. पती ट्रकचालक असल्याने आठ-दहा दिवसांनी ते घरी येत; मात्र मला कोणाचाही त्रास नव्हता. माझा सावत्र भाऊ वारंवार मला माहेरी घेऊन जात असे. आई आणि मला त्याने गोठ्यात राहण्यास जागा दिली होती. गोठ्यातच माझी प्रसूती झाली. त्या काळात चांगले अन्न-पाणी न मिळाल्याने, कुपोषणाने माझे बाळ दगावले. भाऊ दिवसभर शेतात काम करायला लावतो. काम झाले नाही तर मारहाणही करतो. कोणाला काही सांगितल्यास, आईला मारहाण करण्याची धमकी देत असे. माझ्या व आईच्या नावावरील शेती त्याला पाहिजे होती. त्यामुळे तो मला नांदण्यास जाऊ देत नाही.''
"दिलासा सेल'मधील कर्मचाऱ्यांना खरा प्रकार समजल्यावर त्यांनी सावत्र भावाला हाकलले. पती व सासरच्या लोकांना बोलावून घेतले. सासरची मंडळी तिला नांदविण्यास तयार होती. सरिता सासरी गेली. आज तिचा संसार सुखाने सुरू असून, भावाचा जाचही मिटला आहे.
पीडित विवाहिता खूप घाबरलेली होती. त्यामुळे ती काहीच बोलायला तयार नव्हती. मात्र, "दिलासा'च्या "टीम'ने तिला आपुलकीची वागणूक दिली. त्यामुळे खरा प्रकार तिने सांगितला आणि तिची सुटका झाली. विवाहित महिलांनी कोणत्याही त्रासाबद्दल "दिलासा'कडे तक्रार करावी. त्यांना तत्काळ मदत मिळेल.
- जयश्री काळे, पोलिस उपनिरीक्षक, दिलासा सेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.