अग्निशमन बंब मिळेल का हो..... 

अमित आवारी 
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

महापालिकेच्या अग्निशमन विभागाबाबत प्रशासनाची अनास्था कायम आहे. कर्मचारी व वाहनांअभावी केडगावपाठोपाठ सावेडीचेही अग्निशमन उपकेंद्र बंद झाले आहे. शहरात मोठी आग लागल्यास महापालिकेकडे पुरेशी वाहनेच नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. महापालिका प्रशासनाच्या अनास्थेचा फटका नगरकरांना बसू शकतो. 

नगर : महापालिकेच्या अग्निशमन विभागाबाबत प्रशासनाची अनास्था कायम आहे. कर्मचारी व वाहनांअभावी केडगावपाठोपाठ सावेडीचेही अग्निशमन उपकेंद्र बंद झाले आहे. शहरात मोठी आग लागल्यास महापालिकेकडे पुरेशी वाहनेच नाहीत. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. महापालिका प्रशासनाच्या अनास्थेचा फटका नगरकरांना बसू शकतो.

नगर : महापालिकेचे केडगाव येथील बंद असलेले अग्निशमन उपकेंद्र. 

महापालिकेच्या अग्निशमन विभागाची तीन केंद्रे आहेत. विभागाकडे दोनच मोठी वाहने आहेत. त्यात केडगावचे केंद्र वर्षभरापासून बंद आहे. सावेडी उपकेंद्रातील मोठे वाहन दुरुस्तीसाठी पाठविले. त्यामुळे तेथील सर्व कर्मचारी माळीवाडा येथील केंद्रात वर्ग करण्यात आले. शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या घरात आहे. नियमानुसार 50 हजार लोकसंख्येमागे एका मोठ्या वाहनाची आवश्‍यकता असते. त्यानुसार नगरसाठी सात मोठी वाहने आवश्‍यक आहेत. प्रत्येक वाहनावर 21 कर्मचारी, असे गृहीत धरल्यास महापालिकेच्या अग्निशमन विभागात 147 कर्मचारी असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ 30 कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे. हेच पथक आपत्तिव्यवस्थापनाचेही काम करते. त्यामुळे शहरातील आपत्तीविषयी महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याची खंत नागरिक व्यक्‍त करतात. 

वाचा नगरमध्ये गुरुवारी विद्यार्थी साहित्य संमेलन 
 

अग्निशमन विभागाची स्थिती सुधारण्यासाठी महापालिकेने मालमत्ताकराच्या दोन टक्‍के अग्निशमन कर आकारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मांडल्याचे सांगण्यात आले. प्रस्तावाचा चेंडू "स्थायी'ने महासभेच्या कोर्टात टोलवला. 19 फेब्रुवारीपर्यंत महासभाच न झाल्याने, करवाढीचा निर्णय प्रलंबित आहे. मालमत्ताकरात दोन टक्‍के अग्निशमन कर आकारल्यास, त्यातून येणारा निधी वेगळा ठेवता येईल. त्यातून अग्निशमन विभागाची उपकेंद्रे अद्ययावत करणे, नवीन वाहने खरेदी करणे व मनुष्यबळ उपलब्ध करता येईल. सध्या अग्निशमन विभागात मानधनावर 20 कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. 12 हजार लिटर क्षमतेच्या अग्निशमन वाहनाच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. अर्थात, तोपर्यंत तरी नगरकरांची सुरक्षा "राम भरोसे'च आहे. 

वाचा झेडपी अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या अंगणी नांदतो अंधार 
 

जनतेलाच भुर्दंड 
नगर शहरात कुठे आग लागल्यास महापालिका जवळील नगरपालिकांच्या अग्निशमन विभागाची वाहने पाचारण करते. महापालिकेच्या वाहनांनी आग विझविल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, अन्य नगरपालिकांची वाहने बोलाविल्यास संबंधित मालमत्ताधारकाला या नगरपालिकांकडे शुल्क भरावे लागते. महापालिका अग्निशमन विभागाच्या अपुऱ्या वाहनांचा भुर्दंड, आगीत मालमत्तेचे नुकसान झालेल्या नागरिकाला भरावा लागतो. 

वाचा छिंदम हाजिर हो... नगरसेवक पद लागले टांगणीला या 

स्वतःच करा मालमत्तेची सुरक्षा 
नवीन हॉटेल, हॉस्पिटल, रहिवासी अथवा वाणिज्य इमारतींमध्ये अग्निशमन व्यवस्थेशिवाय महापालिका बांधकामास परवानगी देत नाही. मात्र, जुन्या मालमत्तांमध्ये अग्निशमन सुरक्षा, साधने नसतात. अशी सुरक्षा साधने अल्प दरात बाजारात मिळतात. ही साधने घरात बसविल्यास नागरिक स्वतःच मालमत्तेचे रक्षण करू शकतात. 

 

वाहने व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील उपकेंद्रे बंद पडत आहेत. मनुष्यबळ व वाहनांचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. 
- शंकर मिसाळ, अग्निशमन विभागप्रमुख, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savedi's fire station also closed after Kedgaon