गव्याच्या धडकेत पाटगावला महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

कडगाव -  पाटगाव (ता. भुदरगड) येथे जखमी अवस्थेतील गव्याने धडक दिल्याने ऊसतोड मजूर गीता संदीप पांडे जखमी झाल्या. आज दुपारी ही घटना घडली. दिवसभर गव्याने गावात धुडगूस घातल्याने एकच घबराट पसरली आहे.

कडगाव -  पाटगाव (ता. भुदरगड) येथे जखमी अवस्थेतील गव्याने धडक दिल्याने ऊसतोड मजूर गीता संदीप पांडे जखमी झाल्या. आज दुपारी ही घटना घडली. दिवसभर गव्याने गावात धुडगूस घातल्याने एकच घबराट पसरली आहे.

पाटगावशेजारी मोहन वर्धम यांच्या चाफ्याचा मळा या शेतात पूर्ण वाढ झालेला गवा नागरिकांना दिसला. गव्याच्या डोळ्यास दुखापत झाली असल्याने तो आक्रमक होता. तो देसाईवाडीमधील अंगणवाडी व प्राथमिक शाळेजवळ आल्याने घबराट पसरली.

अंगणवाडी सेविका व स्थानिकांनी समयसूचकता दाखवत मुलांना वर्गात घेऊन दरवाजे बंद करून प्रसंगावधान दाखवले. यामुळे अनर्थ टळला. गव्याने जवळ ऊसतोड सुरू असलेल्या ठिकाणी आपला मोर्चा वळवला. तेथे ऊसतोडणी मजूर गीता पांडे यांना धडक दिली. फडात बसलेल्या लहान मुलाच्या अंगावरून उडी मारून पळाला. सौ. पांडे यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात उपचार झाले.

नागरिकांनी प्रसंगावधान राखत गव्याला हुसकावून लावले. गवा काही काळ वेदगंगा पात्रात कोल्हापूर पद्धतीच्या बंधऱ्याशेजारी थांबला. तेथून मौनी महाराज हायस्कूलच्या पाठीमागील वनहद्दीत शिरला. तेथेच रात्री उशिरापर्यंत तो स्थिरावला. तो जखमी असल्याने लोकांवर चाल करत होता. गव्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. वनक्षेत्रपाल संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ए. बी. वसवाडे यांचे पथक पाटगाव येथे तळ ठोकून आहे.

Web Title: woman injured in Gava attack in Patgaon