मायेचे तोडून सर्व पाश, "ती'ने धरला तरुणाचा हात

The woman left the family and fled with the young man
The woman left the family and fled with the young man

पाथर्डी : "घरात उभं वारं सुटतं वो.. मी व मुलगा इकडं-तिकडं पाहतो. आता तरी "ती' येईल, असं वाटतं..' असं म्हणत "त्या'ने पोलिस ठाण्याच्या आवारातच पत्नीसमोर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. "ती'चे आई-वडील, भाऊ, बहीण आणि मेहुणे व नातलग धाय मोकलून रडले.

अखेर नववीत शिकणाऱ्या तिच्या मुलानेही आईला आर्त साद घातली. "आई, आम्हाला सोडून जाऊ नको गं..' असा टाहो फोडला. मुलगा, पती ढसढसा रडले; पण त्या बाईला, तिच्यातील आईला अखेरपर्यंत मायेचा पाझर फुटला नाही. मायेचे सर्व पाश तोडून, नव्या "प्रेमबंधना'त अडकण्यासाठी निघून गेली, ती कायमची! 

निफाड परिसरात आढळून आली

तालुक्‍यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील गावातील ही हृदय हेलावून सोडणारी घटना. पत्नी 15 दिवसांपूर्वी घर सोडून गेल्याची तक्रार पतीने पाथर्डी पोलिसात केली. पोलिसांनी तिचा शोध घेतला असता ती निफाड (नाशिक) तालुक्‍यातील एका गावात तरुणासह राहत असल्याचे समजले. रविवारी (ता. 12) रात्रभर पोलिस, विवाहितेचे नातलग न जेवता तिचा शोध घेत होते. अखेर रात्री 12 वाजता ती पोलिसांना आढळून आली. तिला पाथर्डी पोलिस ठाण्यात आणलं. 

20 वर्षे खूप त्रास सहन केला

तरुणाला सोडून पुन्हा पतीच्या घरी जाण्यासाठी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न नातलगांनी केला. पोलिस अधिकाऱ्यांनीही तिला समजावून सांगितले. मात्र, "मला मुलगा, मुलगी, नवरा, आई-वडील, भाऊ-बहीण व मेहुणे... कोणीही नातेवाईक नको. मी त्यांना मेले आणि ते मला मेले. मला इथे राहायचे नाही. गेली 20 वर्षे मी खूप त्रास सहन केला. आता राहिलेले आयुष्य मनाप्रमाणे जगायचे आहे. माझा निर्णय पक्का आहे,' असे महिलेने पोलिसांना सांगितले. मुलगा, पती तिच्यासमोर ढसढसा रडले; पण तिच्या निर्णयात तसूभरही बदल झाला नाही. उलट, "नवऱ्यापासून मला, तसेच माझ्यासोबत असणाऱ्या तरुणाला धोका आहे. त्याने शपथपत्र करून द्यावे,' अशी मागणी तिने केली.

तुमचा व माझा संबंध संपला 

आपल्या नावावरील सासरची जमीनही तिने परत पतीच्या नावावर करून दिली. "आता तुमचा व माझा संबंध संपला,' असे तिने सांगितले. विवाहितेचे सर्व नातेवाईक पोलिस ठाण्याबाहेरच्या झाडाखाली दिवसभर बसून होते. विवाहिता जाताना ते धाय मोकलून रडले; पण तिचं हृदय पाझरलं नाहीच... 

विवाहितेची मुलगी बाळंतपणासाठी माहेरी

पळून गेलेल्या विवाहितेची मुलगी पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली आहे. "माझ्याकडे नको; किमान मुलांकडे पाहून तरी परत घरी चल,' अशी विनवणी पतीने तिला केली. "किमान मुलीसोबत शेवटचं तरी बोल, मी फोन लावून देतो,' असे सांगूनही ती ऐकत नव्हती. "आता तुमचा व माझा कोणताही संबंध राहिला नाही, मी जाते,' असे म्हणून सर्वांसमक्ष ती चालती झाली ते परत न येण्यासाठीच! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com