अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरुप काढले बाहेर

विजयकुमार कन्हेरे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

कुर्डुवाडी (जि. सोलापूर) : येथील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या विहीरीमध्ये पडलेल्या 30 वर्षाच्या विवाहित महिलेस नागरिकांनी एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले. सविता गोसावी (रा. पिंपळखेड, जि. पुणे) असे त्या महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. 10) संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
गोसावी या राऊत वस्ती भोसरे येथे माहेरी आल्या होत्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर विहीरी जवळ काही महिला काम करत होत्या. त्यांना विहीरीतुन वाचवा वाचवा असा ओरडण्याचा आवाज आला. त्या महिलांनी तेथील रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना महिला विहिरीत पडली असल्याचे सांगितले. उपस्थित लोकांनी क्रेन मागवले. त्याच वेळी त्या रस्त्यावरून जाणारा दत्तात्रय कुंभार (रा. फुलचिंचोली, ता. पंढरपूर) हा युवक पंढरपूर हुन बाह्यवळण रस्त्यावरून परळीला दुचाकी वरुन निघाला होता. तो गर्दी पाहुन त्या विहीरीजवळ आला. तो त्या क्रेन मधुन विहिरीत उतरला. तो क्रेनच्या सहाय्याने महिलेस सुखरुप वरती घेऊन आला. यासाठी माजी नगरसेवक अमरकुमार माने, मुन्ना म्हमाणे, उद्योजक हरी बागल, कुमार बेंडाळे, दीपक शिंदे, विकी चांदणे, ओंकार घोडके, दिनेश बाबर, सागर शिंदे, दयानंद भोसले, सुनील भोरे, नितिन लोंढे, मुकेश चव्हाण, मोनु आठवले, पप्पु वनकुद्रे यांचेसह उपस्थित नागरिकांनी मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman who got out of the well was safely removed