टवाळखोरांची मस्ती, महिलांना धास्ती

राजेश मोरे
सोमवार, 2 जुलै 2018

कोल्हापूर - शाळा, महाविद्यालयांबरोबरच आता महिलांना दारात जाऊन छेडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. महिलांच्या छेडछाडीच्या सर्वच नोंदी पोलिस दप्तरी होत नसल्या, तरी त्यांचा टक्का दिवसेंदिवस वाढूच लागलाय. 

शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोरांची टोळकीच्या टोळकी उभी असतात. विद्यार्थिनींना उद्देशून शेरेबाजी करायची, त्यांचा मोटारसायकलवरून पाठलाग करायचा हे प्रकार नित्याचेच बनले आहेत.

त्यामुळे मुलगी सातवी, आठवीच्या इयत्तेत गेली, की तिची पालकांना चांगलीच काळजी वाटू लागली आहे. मुलींना शाळेत सोडण्यापासून घरी आणण्यापर्यंतचे काम पालक आवर्जून करत आहेत; मात्र ही गोष्ट प्रत्येक पालकाला जमू शकत नाही. विद्यार्थिनींच्या छेडछाडीबरोबर महिलांना दारात जाऊन छेडणाऱ्या महाभागाला काल नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. सकाळी दारासमोर केर लोटणाऱ्या, रांगोळी घालणाऱ्या महिलांना तो गेले तीन महिने छेडत होता. यावरून टवाळखोरांचे धाडस किती वाढले आहे, याचा अंदाज येतो. 

महिलांच्या संरक्षणाबाबत पोलिस दलाकडून विविध उपक्रम राबवले जातात. १९९२ मध्ये सडकसख्याहरींवर कारवाई करणारे व्यापक पथक होते. सध्या निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाकडून दोनचार दिवस कारवाईचा धडाका असतो. मात्र, पुन्हा हे पथक थंड पडते. परिणामी पुन्हा शाळा, महाविद्यालयांसह, महिलांच्या गर्दीच्या ठिकाणी टवाळखोरांचा उपद्रव पुन्हा सुरू होतो. याबाबत तक्रारी करण्यास सहसा महिला, तरुणी पुढे येत नाहीत. त्यामुळे पोलिस दप्तरी याबाबतच्या नोंदींचे प्रमाण कमी दिसत असले; तरी प्रत्यक्ष मात्र टक्का जास्त असल्याचे चित्र आहे. 

विनयभंगाबाबतचे जिल्ह्यातील दाखल गुन्हे 
(१ जानेवारी ते ३० जून २०१८ अखेर)

दाखल गुन्हे   उघड गुन्हे 
८८              ८५

छेडछाड रोखण्यासाठी हे अपेक्षित -
- शाळा, महाविद्यालय सुरू आणि सुटण्याच्या वेळी पोलिसांची गस्त 
- सीसीटीव्हीद्वारे नजर
- शाळा, महाविद्यालयांतील तक्रारपेट्यांबाबत विद्यार्थिनींचे प्रबोधन 
- निनावी तक्रारींची दखल घ्यावी.

टवाळखोरांची ठिकाणे 
 न्यू महाद्वार रोड
 रंकाळा 
 रंकाळा स्टॅण्ड व गंगावेश परिसर
 गांधी मैदान परिसर 
 बिंदू चौक परिसर
  नागाळा पार्क
  सायबर चौक 
 राजारामपुरी परिसर

Web Title: Women Tampering women danger crime