दादा, वाहतुकीचे नियम पाळा बरं का..!; रिक्षाचालकांना महिला पोलिसांनी बांधल्या राख्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

सोलापूर : दादा..., प्रवाशांसह तुमचाही जीव अनमोल आहे, वाहतुकीचे नियम पाळा..., क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवू नका..., प्रवासी मिळविण्याच्या नादात रिक्षा वेगाने चालवू नका... अशी भावनिक गळ घालत शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलिसांनी शनिवारी रिक्षाचालकांना राख्या बांधल्या. 

महिला पोलिसांनी रिक्षाचालक बांधवांना पेढा भरविला. त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. रक्षाबंधन सणाच्या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची विनंती करत त्यांना राख्या बांधल्या. ऐरव्ही वाहतूक नियमन करताना दमबाजी करणाऱ्या महिला पोलिसांनी आजवर आपुलकीने संवाद साधून सख्या बहिणीप्रमाणे स्नेह व्यक्त केल्याबद्दल रिक्षाचालकांनी आनंद, समाधान व्यक्त केला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय चवरे आदी उपस्थित होते. शिवाजी चौकात रिक्षाचालकांना राख्या बांधल्यानंतर महिला पोलिसांनी बस स्थानकात जाऊन एसटी बस चालकांनाही राख्या बांधल्या. तसेच मार्केट यार्ड परिसरात ट्रकचालकांनीही राख्या बांधून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले.

Web Title: women traffic police tie a knot of rakhi to rickshaw drivers hand