जलयुक्‍तमध्ये सोलापूरचा टक्‍का सुधारेना..

तात्या लांडगे
शनिवार, 9 जून 2018

सोलापूर : एकेकाळी जलयुक्‍त शिवारमध्ये अव्वल असलेल्या सोलापूरला पुन्हा अव्वल स्थानासाठी स्पर्धा करावी लागत आहे. 2017-18 मधील जिल्ह्यात 10 हजार 473 कामांपैकी फक्‍त चार हजार 929 कामे पूर्ण झाली. तीन हजार 749 कामे अपूर्णच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्‍तांनी वारंवार सूचना करूनही जलयुक्‍त शिवार अभियानच्या कामांना गती मिळालेली नाही. 

शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्‍त अभियानातून दुष्काळग्रस्त जिल्हे पाणीदार करण्याची चळवळ सुरू झाली. आता त्याकडे शासकीय यंत्रणांकडूनच दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. जलयुक्‍तच्या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, खोल सलग समपातळी चर, शेततळे, वनतळे, अनघड दगडांचे बांध, गॅबियन स्ट्रक्‍चर, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, केटीवेअर, साठवण बंधारा, वळण बंधारा, कालवा दुरुस्ती, नाला खोलीकरण व रुंदीकरण, चर पुनर्भरण, वृक्ष लागवड, ओढा जोड प्रकल्प, गाव तलाव दुरुस्ती, वनराई बंधारे अशी कामे करण्यात येतात. मात्र, 277 पैकी फक्‍त 44 सिमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून विहीर अथवा कूपनलिका पुनर्भरणाच्या तीन हजार 223 पैकी फक्‍त 957 कामे झाली आहेत. तसेच सलग समतल चर, गॅबियन स्ट्रक्‍चर, रिजार्च शाफ्ट, शासकीय व लोकसहभागातून गाळ काढणे, गाव तलाव दुरुस्तीच्या 28 पैकी फक्‍त एकच काम पूर्ण असून बहुतांश कामे झालेलीच नाहीत. कृषी विभाग वगळता अन्य विभागांची बहुतांश कामे अपूर्णच आहेत. त्यामुळे पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत लोकसहभाग वाढत असतानाच शासनाची जलयुक्‍त शिवार योजना मागे पडते की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. 

आकडे बोलतात... 
2017-18 ची स्थिती 
एकूण कामांची संख्या 
10,473 
पूर्ण झालेली कामे 
4,929 
अपूर्ण असलेली कामे 
3,749 
सुरूच न झालेली कामे 
1,795 
एकूण झालेला खर्च 
49.63 कोटी रुपये

Web Title: work is not completed in solapur of jalayukta