esakal | Sangli : जिल्हा नियोजन सभेत प्रलंबित कामे, निधी खर्चावरुन गाजणार
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Collector Office

सांगली : जिल्हा नियोजन सभेत प्रलंबित कामे, निधी खर्चावरुन गाजणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत चालल्याने जिल्हा नियोजन समितीची खुली सभा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. ८) होणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे कामांवर परिणाम झाला आहे. काही कामांसाठी निधी मिळूनही ती अपूर्णावस्थेत आहेत. या कामांवरुन सभेत जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 अंतर्गत पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे तसेच 2020-21 या आर्थिक वर्षातील खर्चाला मंजुरी दिली जाईल. सर्वसाधारण योजनांसाठी पहिल्या सहा महिन्यात केवळ ३० टक्के निधी खर्च झाला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीचा सामना करावा लागत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे, मात्र गेल्या महिन्याभरापासून कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून शासकीय विकास कामेही गतीने सुरु आहेत. या कामांचा आढावा घेण्यासह विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी समितीची सभा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी तीन वाजता आहे. कोरोनामुळे विकासकामांवरील निधीला कात्री लावण्यात आली होती. साथ कमी होताच निधी वर्ग करण्यात आला, मात्र निधी मिळूनही अनेक कामांना सुरुवात झालेली नसल्याची बाबही समोर आली आहे. याबाबतचा जाब अधिकारी यांना सभेत विचारला जाईल.

हेही वाचा: दहावी नापास असलेल्या तोतया डॉक्टरवर छापा; दवाखाना केला सील

जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रम) कार्यक्रमांतर्गत मार्च 2021 अखेरच्या खर्चास मान्यता देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रम) कार्यक्रमांतर्गत सप्टेंबर 2021 अखेरच्या खर्चाचा आढावा घेणे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 अंतर्गत पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीवर पालकमंत्र्यांनी स्वीकृत सदस्यांची नियुक्त केली आहे. नूतन सदस्यांची पहिलीच सभा होणार आहे.

एक दृष्टीक्षेप....

* सन २०१९-२०, खर्च- ९९.९७ टक्के

* सन २०२०-२१, खर्च- ९९.९९ टक्के

* सन २०२१-२२, खर्च- २८.१४ टक्के

( २० सप्टेंबर अखेर)

loading image
go to top