उपाशी राहू; पण हाताला काम द्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

विविध कामांसाठी पश्‍चिम बंगाल, बिहारसह उत्तर भारतातून अनेक कामगार बेळगावात आले होते. मात्र, लॉकडाउनमुळे स्मार्ट सिटीची कामे ठप्प झाल्यामुळे कामगारांची परवड सुरू आहे.

बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतील विविध कामांसाठी पश्‍चिम बंगाल, बिहारसह उत्तर भारतातून अनेक कामगार बेळगावात आले होते. मात्र, लॉकडाउनमुळे स्मार्ट सिटीची कामे ठप्प झाल्यामुळे कामगारांची परवड सुरू आहे. ठेकेदाराने काम नसेल तर पगार मिळणार नाही, असा पवित्रा घेतल्याने या कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. एक वेळ उपाशी राहू; पण हाताला काम अन्‌ दाम द्या, असे आर्जव हे कामगार करत आहेत. 

कामांसाठी पश्‍चिम बंगाल, बिहारसह इतर राज्यातून कामगार मोठ्या संख्येने शहरात आले होते. काही महिने काम सुरळीत सुरू असतानाच लॉकडाउनमुळे सर्व कामे बंद करण्यात आली. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून गावी कुटुंबीयांना पैसे कसे पाठविणार, याची चिंताही लागून राहिली आहे. 

सध्या हे कामगार व्हॅक्‍सिन डेपो येथे तंबू तसेच पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत. चहूबाजूने मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे असलेल्या व्हॅक्‍सिन डेपो परिसरात राहणे मोठ्या जिकिरीचे काम आहे. त्यातच येथे पथदीप, वीज, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नसल्यामुळे कामगारांचे हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठेकेदार धान्य व इतर साहित्याचा पुरवठा करत आहेत; परंतु काम सुरू झाल्यानंतरच पगार दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामगार सध्या चिंतातुर बनले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: workrs jobless condition in belgaum