4,500 पुस्तकांचं ‘किताब घर’! सांगलीतील कुटुंब देतंय घरपोच पुस्तकं

सांगलीतील घरपोच करणारे ‘किताब घर’ या अनोख्या संकल्पनेला जाणून घ्या. ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त मांडलेला त्यांचा प्रवास..!
Book
BookSakal

विनोद आवळे, सांगली

ज्ञान..सर्जनशीलता..त्याचबरोबर कल्पनाशक्तीच्या अथांग क्षेत्राकडे जाणारा ‘वाचन’ हा एक रस्ता आहे. प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणजे वाचन. सर्वत्र प्रचलित असलेले वाक्य म्हणजे, वाचनाने मानव ज्ञानी होतो. त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन ही एक कलाच आहे. वाचन माणसाला माणूस बनवितो, जीवनाला एक वेगळी अन् नवी दिशा देतो, विचार करायला शिकवितो तसेच जीवनात योग्य, अयोग्याची जाणीव करून देखील देतोच. वाचनाची गोडी मनात रुजवली तर माणूस वाचतो. अन् मग सुरू होतो वाचनाचा प्रवास. असाच प्रवास सुरू करायचा असेल तर मग सांगलीतील घरपोच करणारे ‘किताब घर’ या अनोख्या संकल्पनेला जाणून घ्या. ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त मांडलेला त्यांचा प्रवास..!

सांगली किताबघर
सांगली किताबघरSakal

सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग येथील पवार कुटुंब. या कुटुंबाने २०२३ पासून ‘किताब घर’च्या माध्यामातून संपूर्ण सांगली शहरात घरपोच पुस्तक देण्याची मोहिम सुरू केली. हे अनोखे असे ‘किताब घर’ चालवत असल्यामुळे वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आई रत्नप्रभा पवार व वडील दिपक पवार यांना वाचनाची खूप आवड. त्यामुळे त्यांनी आपली मुलगी केतकीलाही वाचनाची सवय लावली होती. अनेक लोकांना वाचायचे असेल, तर कोणत्या तरी ग्रंथालयात जाऊन पुस्तके आणावी लागत. केतकी या देखील वाचनासाठी पुस्तके आणण्यासाठी ग्रंथालयात जात होत्या. हाच विचार करत केतकी यांनी आपण लोकांना घरपोच पुस्तके उपलब्ध केली तर लोक अधिकाधिक वाचू लागतील. सध्याच्या धकाधकीच्या जगात लोकांना ग्रंथालय, वाचनालयात जाऊन पुस्तके पाहायला, आणायला सहसा वेळ मिळत नाही. ज्या लोकांना पुस्तके मिळत नाहीत, अशा लोकांना आपण घरापर्यंत पुस्तके उपलब्ध करू देऊ. मग करणार कसे? अशी चर्चा त्यांच्या कुटुंबात सुरू झाली. आणि मग केतकी यांच्या संकल्पनेतून ‘किताब घर’ उभं राहिलं.

केतकी या सध्या गोव्यात नोकरी करत सांगलीतील किताब घर सांभाळतात. पुस्तकांची ऑनलाईन मागणी, पुस्तक खरेदी आदी कामे त्या तिथून करत असतात. सांगलीमध्ये त्यांच्या आई रत्नप्रभा आणि दिपक पवार हे गाडीवरून पुस्तक घरपोच करण्याचे काम करतात. स्वत: कुटुंब राबत असल्याने वाचक देखील हळूहळू वाढू लागले आहे. केतकी यांनी स्वत: पैसे खर्च करुन ही संकल्पना उभी केली. १ मे २०२३ पासून सांगली जिल्ह्यात सुरू झालेले हे किताब घर सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरात पोहचले आहे. सुरूवातील बारा सदस्य होते. त्याची संख्या शेकडोमध्ये गेली आहे. संख्या खूप वाढेल, असा विश्वास केतकी यांना आहे.  जुनी आणि नवीनतम संग्रह असलेली सर्व प्रकारची पुस्तके आहेत. यासाठी ते वाचकास पुस्तकांच्या यादीची पीडीएफ फाइल देतात आणि नंतर लोक त्यातून पुस्तके निवडतात. घरी मुले असतील तर त्यांच्यासाठी किड्स लायब्ररी मोफत आहे. सदस्यत्वासाठी मासिक चार पुस्तके आणि मुलांना विनामूल्य सदस्यत्व मिळते.

सांगली किताबघर
सांगली किताबघरSakal

स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही लवकरच...

लहान मुलांपासून ते वयोवृद्ध वाचतील, अशी सर्वच पुस्तके ‘किताब घर’ येथे उपलब्ध आहेत. जवळपास चार हजारहून अधिक पुस्तके आहेत. पुस्तके मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेवर आधारित आहेत. लहान मुलांची पुस्तके मोठे फोटो आणि चित्रांसह जास्तीत जास्त इंग्रजी आहेत. त्यामुळे मुले त्याचा आनंद घेऊ शकतात. त्यातून वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतात. पुस्तके कल्पनारम्य, विज्ञान कथा, भयपट, कॉमिक थ्रिलर, इतिहास, काल्पनिक, नॉन फिक्शन, पौराणिक कथा, रोमॅटोक, चरित्र, रहस्य, कविता, क्लासिक्स, परीकथा, प्रेरणा, शेअर बाजार अशी बरीच वेगवेगळी पुस्तके किताब घर येथे उपलब्ध आहेत. आता स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अभ्यासाची पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा केतकी यांचा मानस आहे.

केतकी पवार सांगतात, ‘‘स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सेट/नेट परीक्षांसाठीही अभ्यास पुस्तके आमच्याकडे उपलब्ध आहेत. जी आवश्यकतेनुसार त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली जातील. हा संपूर्णपणे पुस्तकांचा घरपोच प्रकल्प आहे. आमच्या घरी आम्ही इतरांसाठी पुस्तके वाचण्यासाठी एक लहान जागा तयार केली आहे. जर तुम्ही तेथे येणार असाल, तर पुस्तके निवडा आणि निवांत वाचत बसा. येथे वाचन विनामूल्य असेल. आम्ही आता कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरात देखील हा प्रकल्प सुरु करत आहोत.

पुढे त्या सांगतात, ‘‘आम्हाला आशा आहे की, आमचे ग्रंथालय समाजासाठी एक केंद्र बनेल. जिथे लोक एकत्र येऊ शकतील, विचारांची देवाणघेवाण करू शकतील आणि एकमेकांना प्रेरणा देऊ शकतील. वाचनाला जीवनाचा एक आवश्यक भाग म्हणून प्रोत्साहन देणे आणि पुस्तकांच्या प्रेमातून लोकांना जवळ आणणे, हे आमचे ध्येय आहे. याशिवाय, नवोदित लेखकांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आणि त्यांचे कार्य प्रकाशित करण्यासाठी आम्हाला एक व्यासपीठ तयार करायचे आहे. आमचा विश्वास आहे की, प्रत्येकाकडे सांगण्यासाठी एक कथा आहे आणि प्रत्येक कथा सामायिक करण्यासारखी आहे.

शहरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पुस्तके पोहचवण्याचा या कुटुंबाचा मानस आहे. हे किताब घर प्रत्येक जिल्ह्यात कसे नेता येईल, याचाही विचार सांगलीतील पवार कुटुंब करत आहे. आपल्या ग्रंथालयातील एक तरी पुस्तक सांगली शहरातील प्रत्येक घरात जावे, यासाठी हे केतकी यांच्यासह हे कुटुंब स्वत: राबत आहे. शेवटी सांगण्याचा मुद्दा हाच की, वाचन ही एक भूक आहे. ती सतत वाढावी आणि माणसाने वाचत राहावे, तेव्हा आत्मविश्वास ‘वाढेल’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com