अबब! दहा टक्‍के भारतीयांना तंबाखूचे व्यसन

Tobacco-Cigarette
Tobacco-Cigarette

सातारा - ‘तंबाखूसेवन जानलेवा है, तंबाखू से कॅन्सर होता है!’ हे तंबाखूच्या पुडीवर लिहिलेले असते; पण ते वाचतो कोण? आणि वाचले तर त्याचे पालन करतो कोण? तब्बल दहा भारतीयांपैकी एक जण तंबाखूचे धूम्रपान करत असल्याचे ‘गॅटस’च्या सर्वेक्षणात सामोरे आले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ११.९ टक्‍के, शहरी भागांमध्ये ८.३ टक्‍के आहे. सर्वेक्षणानुसार भारतात दररोज पाच हजार नागरिकांना तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागत आहे. 

भारतात तंबाखू अनेक प्रकारच्या धुम्ररहीत प्रकारांमध्ये वापरला जातो. यात तंबाखू पान, मशेरी, खैनी, गुटखा, भुकटी व पान मसाल्यांद्वारे तंबाखूसेवन होत असते. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे २०१८ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘ग्लोबल ॲडल्ट टोबॅके सर्व्हे- टू’नुसार (गॅटस) ग्रामीण भागातील दर तीनपैकी एक व्यक्ती आणि शहरांतील दर पाचपैकी एक व्यक्ती तंबाखूचे या विविध प्रकारे सेवन करते. खैनी म्हणजेच तंबाखू चुन्याच्या मिश्रणाचे दर नऊ प्रौढांपैकी एकाकडून (११.२ टक्‍के) सेवन केले जाते. ७.७ टक्‍के प्रौढ भारतीय विडी ओढतात. गुटखा हे तंबाखू, चुना आणि सुपारीचे मिश्रण असून, ६.८ टक्‍के लोक, ५.८ टक्‍के लोक तंबाखू पानाचे सेवन करतात. तंबाखूसेवनाचे पुरुषांमधील प्रमाण ४२ टक्‍के आहे, तर महिलांमध्ये १४.२ टक्‍के आहे. दिवसेंदिवस तोंडाच्या कर्करुग्णांचे प्रमाण वाढत असून, दर वर्षी तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळल्याचे अहवालातून दिसून आले आहे.

डॉ. मनोज लोखंडे सांगतात...
  धूम्रपानामुळे सात हजार विषारी रसायनांशी संपर्क येतो. ज्यात ७० घटक कार्सिनोजेनिक असून, ते शरीरातील बहुतेक सर्व अवयवांचे नुकसान करतात.
  तंबाखूमुळे होणारे नुकसान जन्माआधीपासूनच सुरू होते. ज्या महिला गरोदरपणात धूम्रपान करतात, त्यांच्या नवजात बालकांना जन्मजात आजार, कर्करोग, फुफ्फुसाचे विकार आणि अचानक होणारा मृत्यू असे धोके असतात.
  मूत्रपिंडे निकामी होणे, आतड्यांमधील रक्त कमी होणे आणि हायपरटेन्सिव्ह हृदयविकार हे तंबाखूचे धोके नव्याने आढळून आले आहेत.
  फुफ्फुसांचा कर्करोग हा पुरुषांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणारा मोठ्या प्रमाणावर आढळणारा घटक आहे. 
  जगभरातील मृत्यूंसाठी कारणीभूत असणारे हृदयविकार आणि स्ट्रोक हे आजारही तंबाखू सेवनाशी संबंधित आहेत.
  तंबाखूमुळे तुमच्या दातांवर डाग पडतात आणि श्वासाला दुर्गंधी येते. एवढेच नव्हे तर तुमची जीव्हाग्रांचे (चव जाणवून देणारे घटक) नुकसान होते. त्याचप्रमाणे हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो आणि तोंडाचा व घशाचा कर्करोग होऊ शकतो.
  धूम्रपान करणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. कारण धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते. तुम्हाला दमा असेल तर तुम्हाला दम्याचा झटका वारंवार येऊ शकतो. त्याचप्रमाणे खोकला आणि कफ होतो.
  धूम्रपानामुळे त्वचा कोरडी आणि पिवळी पडते व सुरकुत्या पडतात.
  तुमच्या स्नायूंमध्ये रक्त आणि ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com