वाह..! मोदीजी वाह..!! 

Narendra Modi's meeting in satara
Narendra Modi's meeting in satara

ज्या महापुरुषाला टीव्हीत पाहो-पाहोनच गेली पाच वर्षे खर्ची झाली होती... ज्याच्या हर-एक शब्दाने जगण्याचा क्षीण जावोन लढण्याचं बळ प्राप्त झालं होतं... साक्षात तो दैवी अवतार या इथे सातारनगरीत प्रविष्ट होणार... या विचारानेच आम्हाला गेले पंधरा दिवस झालं झोप लागली नव्हती... झोपेत-जागेपणी यत्र-तत्र फक्त त्याच महापुरुषाचा ध्यास आम्हास लागला होता...
 
आम्ही मध्यप्रहरीचं दचकून मोदी-मोदीचा गजर करत असू... याबद्दल अनेकदा आमची मंडळी आम्हाला "गप झोपा की... राजच्याइरीचं...' वगैरे म्हणत गप करत. खरंतर आमचे सख्खे आई-वडील आणि बायको-मुले यापेक्षाही आमची सध्या या विकासपुरुषावर श्रद्धा आहे.... ज्याने एका रातीत काळा पैसा रद्दबातल केला... दहशतवाद मुळातून संपवला... आणि अगदी अलीकडेच ज्याने महाराष्ट्र राज्याच्या विकासाकरिता तीनशे सत्तर सारखा ऐतिहासिक निर्णय घेतला... असा हा सर्वगुणसंपन्न नेता इतिहासात होणे नाही म्हणजे नाहीच..!! 

याच प्रेरणेतून अगदी रानावनातही आम्ही "मोदी मोदी' हा गजर करत हिंडीत असतो... कधी आमच्या शेताचा बांध फुटोन पाणी दुसऱ्याच्या शेतात जाते किंवा मग आमच्या पिकात डोबरं शिरूनी उच्छाद मांडतात. पण, आम्ही कशाचीही तमा न बाळगता "मोदी-मोदी' चा जप सोडत नाही... खरंतर महापूर, मंदी आणि दीर्घकालीन बेरोजगारी यामुळे तर आम्हाला आता बराच वेळ मिळत असोन या महापुरुषाच्या भक्तीत तल्लीन होऊन आम्ही तो सत्कारणी लावत असतो... 

खरंतर मोदीजींच्या कलम तीनशे सत्तरच्या या निर्णयामुळे काश्‍मीरात जाऊन 86032 वाणाचा ऊस लावण्याचं आमचं प्रयोजन आहे. खरंतर आम्ही जरी शैक्षणिकदृष्ट्या आठवी नापास वगैरे असलो तरीही केवळ आणि केवळ मोदीजींशी असलेल्या गहिऱ्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्या शैक्षणिक धोरणांचं समर्थन करोन विरूद्ध पार्टीला अक्षरशः झोडपून काढत असतो... तथा मोदीजींमुळे अंतर्गत विरोधकांसह चायना, पाकिस्तानसारखे आंतरराष्ट्रीय विरोधकही कसे वठणीवर आले आहेत... हेही आम्ही ठासून सांगत असतो... 

पण आता साक्षात आमचं काळीज आदरणीय महाराजियांच्या प्रचारासाठीच साक्षात हे दिव्य महापुरुष आपल्या नगरात येणार म्हणून आम्ही आनंदून गेलो होतो... तथा शिपाई पदासाठीची परीक्षा देऊ-देऊन सफेद झालेली केसं कलप करोन, पांढऱ्या शुभ्र रंगाची तलम वस्त्रं नेसोन आणि केवळ मोदीजींसाठी लोणंद-सातारा या रस्त्यावरचे कंबरडे मोडणारे खड्डे सोसून भल्या पहाटेच आम्ही सैनिक स्कूलच्या आवारात पोचलो होतो... तहान-भूक विसरोन तब्बल दुपारपर्यंत त्या महापुरुषांच्या वाटेला आम्ही डोळे लावून बसलो... आणि ती महा"घडी'आली... इतक्‍या वर्षे खोबण्या झालेल्या आमच्या डोळ्यात दिव्यतेज चमकलं... 

तथा त्या महापुरुषाला पाहोन आपोआपच आमच्या डोळ्याचा बांध सुटला... त्या परममहापुरुषाला जावोन घट्ट मिठी मारावी आणि साऱ्या समस्यांचे हल शोधावे, असे आम्हाला वाटत होते. पण, आमचे तसे डेरिंग झाले नाही...!! कारण त्यांच्यात आणि आमच्यात फार अंतर होतं !! 

मग, फायनली ते दिव्यमहापुरुष बोलावयास लागले... 

इस सातारा से मेरा अतूट नाता है। मे बचपन में यहा आता था... क्षेत्र माहुली तो में कई बार आ चुका हूँ... ये सातारा मेरी कर्मभूमी है!!" एकूणात या विचारांती सभा झाली आणि आम्ही धन्य झालो तथा आमचं जीवन सार्थकी लागलं...!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com