जोंधळखिंडीच्या तालमीत मुली घेतायत कुस्तीचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो.

विटा - दुष्काळी पट्ट्यातील जोंधळखिंडी (ता. खानापूर ) येथील तालमीत 23 मुली कुस्तीचे मोफत प्रशिक्षण घेत आहेत. संजय अवघडे यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज पहाटे पाचपासून सकाळी सातपर्यंत व सायंकाळी सहा ते आठ असा कुस्तीचा न चुकता त्यांचा सराव सुरू असतो. आतापर्यंत या मुलींनी हरियाणा, मुंबई, वर्धा, झारखंड, नागपूर, कोल्हापूर, फलटण, पेठवडगांव येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धामध्ये पदके मिळविली आहेत.

जोंधळखिडीत कौलारू जुनी तालीम आहे. या तालमीत वाळूज, सांगोले, जरंडी, जोंधळखिंडी, साळसिंगे, नेवरी येथील प्रियांका डुबुले, प्रेरणा गायकवाड, शिवानी सुतार, निकिता वाघमारे, स्वामिका बाबर, ऐश्वर्या डुबुले, वैभवी पाटोळे, अक्षरा पाटोळे, अमृता गवळी, अमृता बाबर, ऋतुजा शिंदे, अंकिता पवार, प्रिती पाटील, राजनंदिनी शिंदे, गौरी शिंदे, सुहानी शिंदे, श्रध्दा शिंदे, प्राची शिंदे, दीक्षा घाडगे, अस्मिता आडके, अश्विनी शिंदे, तनिषा जाधव, आदिती महाडीक अशा एकूण तेवीस मुली कुस्तीचे धडे घेत आहेत.

या मुली गरीब घरातील आहेत. कोणाचे वडील शेतकरी, पेंटींग व्यवसाय, रोजगार करणारे तर काहींच्या वडीलांचे छत्र हरविलेले आहे. त्यांना कुस्तीची आवड असल्याने त्या कुस्तीच्या आखाड्यात उतरल्या आहेत.

या मुलींचा राज्यात नावलौकीक होऊ लागला आहे. या मुलींची प्रेरणा घेऊन अनेक मुली कुस्ती क्षेत्रात येऊ पाहत आहेत. परंतु याठिकाणी सुसज्ज तालमीची गरज आहे. सध्या मोडकळीस आलेल्या तालमीत या मुली प्रशिक्षण घेतात. तेथे शौचालय, निवास, चेजिंग, वॉश रूमचा अभाव आहे. ग्रामपंचायतीने या सुविधा उपलब्ध करून दिल्यास मुलींची सोय होईल. सुसज्ज इमारतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे, 

गेली वीस वर्षे सामाजिक कार्य म्हणून मुलींना कुस्तीचे मोफत प्रशिक्षण देत आहे. ज्या मुलींची आर्थिक परिस्थिती नाही अशा मुलींना पाैष्टीक खाद्यासाठी लोकसहभाग, सामाजिक संस्थातर्फे आर्थिक मदत मिळाल्यास मुलींना याचा फायदा होईल. सध्या अडचणीवर मात करत तालमीत मुलींचा सराव सुरू आहे. 
- संजय अवघडे,
 कुस्ती प्रशिक्षक 
 
मला कुस्तीचा नाद आहे. मी कुस्तीच्या स्पर्धा घ्यायचो. मुलीलाही कुस्तीची आवड निर्माण झाली. मी दररोज पहाटे पाचला मुलीला कुस्ती सरावासाठी विट्यातून जोंधळखिंडीला घेऊन जातो. ती उत्कृष्ट कुस्ती खेळाडू व्हावी, यासाठी कष्ट घेत आहे. 

- प्रविण शिंदे, पालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wrestling training in JondhalKhindi Talim