बेळगाव ; यंदा खानापूर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस 

सतीश जाधव
Thursday, 3 September 2020

यंदा जूनपासून पावसाला सुरवात झाली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला.

बेळगाव - गतवर्षीप्रमाणे यंदा पावसाने हाहाकार उडवला नसला तरी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश जलाशये भरली आहेत. तरीसुद्धा गतवर्षीपेक्षा यंदा सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झाला आहे. गतवर्षी मार्च ते ऑगस्टपर्यंत सहा महिन्यात जिल्ह्यात सरासरी 839.95 मिमी पाऊस झाला होता. मात्र, यंदा याच काळात 678.46 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच यंदा 161.49 मिमी पाऊस कमी झाला आहे.

दरवर्षी खानापूर तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्या खालोखाल बेळगाव तालुक्‍याचा क्रमांक आहे. यंदाही याच दोन तालुक्‍यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अथणी, रामदुर्ग व मुडलगी तालुक्‍यात सर्वात कमी पाऊस पडतो. यंदाही या तीन ठिकाणीच सर्वात कमी पाऊस झाला आहे. गतवर्षी मार्च ते ऑक्‍टोंबरपर्यंत चांगला पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात तर पावसाने कहर केला होता. सुमारे आठ दिवस महापूर होता. त्यात कोट्यवधींचे नुकसान होण्याबरोबरच अनेकांना विस्थापित व्हावे लागले होते. त्यावेळेस ऑगस्टमध्ये सर्वाधिक 421.5 मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदाही ऑगस्टमध्येच पावसाने झोडपून काढले होते. पण, त्याचा जोर गतवर्षीपेक्षा कमी होता. यंदा या महिन्यात सरासरी 282.9 मिमी पाऊस झाला. गतवर्षीप्रमाणे यंदाही राकसकोप जलाशय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच भरले आहे. तसेच हिडकल जलाशयही सलग दुसऱ्या वर्षी ओसंडून वाहत आहे.

 यंदा जूनपासून पावसाला सुरवात झाली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला. त्यामुळे, हा पाऊस पिकांसाठी पोषक ठरला आहे. भातांसह अन्य पिकांची वाढ चांगली आहे. मात्र, दोनवेळा आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसानही झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मात्र, गतवर्षीचा अनुभव पाहता सप्टेंबरमध्येही पाऊस होण्याची शक्‍यता आहे.

संपादन - धनाजी सुर्वे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this year heavy rain in belgaum khanapur taluka