वडवळच्या युवा शेतकरी दांपत्याला मिळणार "या' पिकामुळे सहा लाखांचे उत्पन्न

Farmers
Farmers

वाळूज (सोलापूर) : दोघेही सुशिक्षित. एकमेकांची मने संसारात फुलवत असतानाच पारंपरिक शेती करता करता शेतात वेगळे प्रयोग करण्याचा छंद त्यांना आहे. संसार फुलवीत फुलवीत शेतात शतावरीचा मळादेखील छान फुलवला आहे. वडवळ (ता. मोहोळ) येथे पारंपरिक पिकांसोबतच आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या "पांढऱ्या शतावरी'चे उत्पन्न त्यांनी घेतले असून काही महिन्यांतच या एक एकर शतावरीच्या कंदापासून किमान सहा लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. मनोज मोरे व अनुजा मोरे असे या युवा शेतकरी दांपत्याचे नाव आहे.

प्रतिकिलो मिळणार 50 रुपये
अनुजा मोरे यांचे शिक्षण बारावीपर्यंत तर मनोज मोरे यांचे डी फार्मसी झाले आहे. या युवा शेतकरी जोडीने आपला गावातील मेडिकल दुकानाचा व्यवसाय सांभाळत पारंपरिक शेतीत काहीतरी नवीन बदल करावा, या हेतूने त्यांचे इंदापूर येथील मित्र पद्मसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पांढऱ्या शतावरीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. वडवळ येथे त्यांची 12 एकर शेती आहे. त्यापैकी एक एकरावर शतावरीचे पीक घेतले आहे. पुणे येथील एका कंपनीशी करार करून हे पीक घेण्यात आले आहे. याच्या खरेदीची हमी देखील कंपनीच घेणार आहे. मे 2018 मध्ये एक एकरात आठ बाय पाच अंतरावर 1000 रोपे लावण्यात आली. रोपे खरेदी करणे, लागण करणे, शेणखत, गांडूळ खत, गावखत टाकणे व नंतर जेसीबी मशिनच्या साहाय्याने हे पीक जमिनीतून काढणे यासाठी एक लाख 50 हजार खर्च आला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर दिला आहे. यापासून एकरी 12 टन उत्पन्न अपेक्षित आहे. एका रोपाच्या मुळ्यांचा गुच्छ 20 ते 25 किलोपर्यंत निघतो, प्रतिकिलो 50 रुपयांप्रमाणे याची खरेदी होणार असून त्यामुळे कमीत कमी सहा लाख उत्पन्न मिळणार आहे. ही वेलवर्गीय झुडूप असलेली वनस्पती आहे. साधारण पाच ते सहा फूट उंच वाढते. याला तार व बांबूचा आधार देऊन याची वाढ होऊ दिली जाते. शतावरीच्या मुळ्या हेच याचे पीक व उत्पन्न. या मुळ्या गुच्छच्या स्वरूपात वाढतात.

कशी आहे नेमकी "शतावरी'?
संस्कृत भाषेमध्ये हिला "नारायणी' तर शास्त्रीय भाषेत "असपरेगस रेसीमोसस' असे म्हणतात. ही बहुवार्षिक आरोहिणी वेलवर्गीय वनस्पती आहे. हिला पांढरी फुले येतात. झाडाची मुळे जाड, लांबट, गोल दोन्ही टोकाकडे निमुळती असतात. यालाच कंद म्हणतात. हे कंद पांढऱ्या रंगाचे असतात. ही मुळे जमिनीखाली बुंध्याजवळ झपाट्याने वाढतात. एका वेलीस अनेक मुळ्या म्हणजे साधारण 100 मुळ्या फुटतात. एकावेळी 100 मुळ्या फुटल्यामुळे तिला "शतमुळा' किंवा "शतावरी'असे म्हणतात.

"शतावरी' देते हमखास उत्पन्न
नवीन प्रयोग करताना विविध फसव्या कंपनी व बोगस एजंट शेतकऱ्यांना भुरळ पाडतात. यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहून व्यवस्थित चौकशी करून खात्री करूनच कंपनीशी करार करावा. शतावरी ही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. पिकाची योग्य ती देखभाल केल्याने हमखास उत्पन्न मिळते अशी खात्री आहे.
- मनोज मोरे, शेतकरी, वडवळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com