युवा फुटबॉलपट्टूंना मिळणार आंतरजिल्हा स्पर्धेत प्रोत्साहन

दीपक कुपन्नावर
शनिवार, 18 जानेवारी 2020

युवा फुटबॉलपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेतर्फे (एआयएफएफ) विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून इंडियन सुपर लीग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लिग (आय लीग), संतोष ट्रॉफी अशा अव्वल राष्ट्रीय स्पर्धातून युवा खेळाडूंना घेणे बंधनकारक केले आहे. त्याच धर्तीवर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) यंदा खुल्या आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेतही युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्हा संघात 21 वर्षाखालील पाच खेळाडू घेऊन त्यातील तीन खेळवणे बंधनकारक राहणार आहे.

गडहिंग्लज : युवा फुटबॉलपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेतर्फे (एआयएफएफ) विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून इंडियन सुपर लीग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लिग (आय लीग), संतोष ट्रॉफी अशा अव्वल राष्ट्रीय स्पर्धातून युवा खेळाडूंना घेणे बंधनकारक केले आहे. त्याच धर्तीवर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) यंदा खुल्या आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेतही युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्हा संघात 21 वर्षाखालील पाच खेळाडू घेऊन त्यातील तीन खेळवणे बंधनकारक राहणार आहे. 

विफातर्फे 2 फेब्रुवारीपासून कोल्हापूरात आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा होणार आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने (केएसए) संयोजन केलेल्या या स्पर्धेत राज्यातील 34 जिल्ह्यांचे संघ सहभागी होतील. भारतीय फुटबॉलचा दर्जा सुधारावा यासाठी जागतिक फुटबॉल संघटनेतर्फे कुमार आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठीच या खेळाडूंना खेळण्याच्या अधिक संधी निर्माण करण्यासाठी एआयएफएफ प्रयत्नशील आहे. त्याबाबतच्या सूचना राज्य फुटबॉल संघटनानाही दिल्या आहेत. 

यंदा भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च स्पर्धा म्हणून आयएसएलला स्थान देण्यात आले. या आयएसएल मध्येही 23 वर्षाखालील तीन खेळाडू संघात घेणे सक्तीचे आहे. आय लीग संघांनाही 23 वर्षाखालील पाच खेळाडू संघात बंधनकारक आहेत. अवल संतोष ट्रॉफी या राष्ट्रीय स्पर्धेतही 21 वर्षाखालील तीन खेळाडू बंधनकारक असून यातील दोघांना पहिल्या अकरात स्थान देणे सक्तीचे आहे. याच पद्धतीने यंदा होणाऱ्या आंतरजिल्हा स्पर्धेत "विफा'ने सर्व जिल्हा संघाना 21 वर्षाखालील पाच खेळाडू बंधनकारक केले आहेत. यातील तीन खेळाडू पहिल्या अकरात मैदानात उतरतील. बदली खेळाडू करतानाही 21 वर्षाखालील खेळाडू ऐवजी त्याच वयाचा खेळाडू बदलता येणार आहे. याबाबतचा बदल सर्व जिल्हा संघटना कळविण्यात आला आहे. 

नवी अट
संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेसाठी आंतरजिल्हा स्पर्धेतील कामगिरीवरून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. त्याठिकाणीही 21 वर्षाखालील खेळाडू गरजेचे असल्याने यंदाही नवी अट लावली आहे. 
- साऊटर वाझ, सचिव, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young footballers will get Encouragement