कऱ्हाडजवळ युवकाचा गोळी घालून निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

कऱ्हाड - शिकारीला सोबत नेलेल्या युवकाचा गोळी घालून खून केल्याबद्दल पंचायत समितीचे माजी सभापती किसन लक्ष्मण जाधव (वय 76) यांच्यावर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. येणपे येथे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. कमलेश लक्ष्मण पाटील (वय 22) असे खून झालेल्याचे नाव आहे. जाधव हा काल रात्रीच पोलिसात हजर झाला. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर कमलेश यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर आज दुपारी येणपे येथे अंत्यसंस्कार झाले. कमलेशचे वडील लक्ष्मण पाटील यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की कमलेश पाटील यांच्या वडिलांचा येणप्यात हॉटेल व्यवसाय आहे. काल मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे घरी आले व त्यांनी सांगितले, की कमलेश हा किसन जाधव व अजित आकाराम जाधव यांच्यासोबत शिकारीला गेला होता. त्यावेळी त्याला तेथे बंदुकीची गोळी लागून तो जखमी झाला आहे. लक्ष्मण व शेजारचे लोक घटनास्थळी निघाले. वाटेत त्यांना समजले, की किसन जाधव याच्या बंदुकीतून गोळी लागून कमलेश यांचा मृत्यू झाला आहे. ते तेथे पोचले. कमलेशच्या छातीवर गोळी लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. 

गोळी लागल्याची जागा, मृतदेहाची अवस्था व मृतदेह पडल्याचे ठिकाण यावरून किसन जाधव याने कमलेशचा गोळी घालून खून केला आहे. काल सायंकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्री दीडपर्यंत कमलेश किसन जाधव त्याच्यासोबत होता. त्याच कालावधीत त्याने खून केला आहे, असे कमलेशचे वडील लक्ष्मण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

संशयित माजी सभापती जाधव मध्यरात्रीनंतर पोलिसांत स्वतः हजर झाला आहे. त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी संबंधित बंदूक जप्त केली आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सखोल चौकशी करूनच त्याबाबत बोलता येईल. माजी सभापती किसन जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, असे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी भेट देऊन पाहणी केली. 

चौकशीसाठी स्वतंत्र पथक 
कमलेश पाटील यांचा गोळी लागून खून झाल्यानंतर माजी सभापती जाधव स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. मात्र, गुन्हाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. पोलिसही जाधव सांगत असलेल्या कारणांशी सहमत नाहीत. ही घटना का घडली, यामागची कारणमिमांसा शोधून काढण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. पूर्वीचे काही कारण आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे उशिरापर्यंत कारणांबाबत संभ्रमावस्था होती.

Web Title: The young man's brutal murder