राजू शेट्टींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला हकलले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

शेतकऱ्यांना बेईमान म्हणणारे तुम्ही कोण? सत्तेत असून मागण्या कोणाला करत आहात? आठवड्याभरापुर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या तालुक्यात येऊन सभा घेता, मग त्याच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? असे प्रश्न तरुणाने राजू शेट्टी यांना विचारले.

माढा - शेतकऱ्यांचे कैवारी अशी ओळख असलेले स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांना भर सभेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला हाकलून देण्यात आल्याची घटना माढा येथे घडली.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालूक्यातील लऊळ या गावी राजू शेट्टी यांची सभा होती. शेतकऱ्यांच्या सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, की आपण त्यांना साथ देणार असू, तर आपण पण बेईमान आहोत हे लक्षात ठेवा. रामाचा किंवा कृष्णाचा अवतार घेऊन कोणी तुमचे प्रश्न सोडवायला येणार नाही. तुम्हालाच तुमचे प्रश्न सोडवावे लागतील. त्यासाठी तुमचा सहभाग नोंदवावा लागेल.

भर सभेत राजू शेट्टी शेतकऱ्यांना बेईमान असे म्हटल्यानंतर एका तरुणाने त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना बेईमान म्हणणारे तुम्ही कोण? सत्तेत असून मागण्या कोणाला करत आहात? आठवड्याभरापुर्वी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या तालुक्यात येऊन सभा घेता, मग त्याच्या कुटुंबाची भेट का घेतली नाही? असे प्रश्न तरुणाने राजू शेट्टी यांना विचारले. मात्र, त्या तरुणाचे प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच पोलिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभेतून हाकलून दिले. यावेळी राजू शेट्टी यांनी 'तू काहीही बोलला तरी माझ्यावर परिणाम होणार नाही', असे म्हटल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.

Web Title: youngster asked to leave the Raju Shettys public meeting in Solapur

व्हिडीओ गॅलरी