युवकासह दहा कुटुंबांना बहिष्कृत केल्याप्रकरणी पसार आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

तळेगाव दिघे - पारेगाव खुर्द (ता. संगमनेर) येथील आंतरजातीय विवाह केलेल्या युवकासह दहा कुटुंबांना तिरमली समाजाच्या जातपंचायतीने बहिष्कृत केले. जातीबाहेर काढलेल्या कुटुंबांना पुन्हा जातीत घेण्यासाठी 27 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पोलिसांनी याप्रकरणी पसार आठही आरोपींना गुरुवारी अटक केली.

पारेगाव खुर्द येथील माणिक हनुमंत हाटकर (वय 28) या तिरमली समाजाच्या युवकाने दुसऱ्या जातीतील युवतीशी आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे या युवकासह त्याच्या नातेवाइकांच्या दहा कुटुंबांना जातपंचायतीने जातीबाहेर काढले. त्यांना पुन्हा जातीत घेण्यासाठी जातपंचायतीच्या पंचांनी 27 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी माणिक हाटकर याने पोलिसात फिर्याद नोंदविली. त्यानुसार जातपंचायतीच्या दहा पंचांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गंगाराम वेंकट मले (रा. श्रीगोंदे फॅक्‍टरी) व रामा साहेबराव फुलमाळी (रा. ओझर, ता. जुन्नर) या दोघांना पोलिसांनी अटक केली; मात्र आठ आरोपी पसार झाले होते. संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने उत्तम दौलत फुलमाळी, उत्तम हनुमंता फुलमाळी, सुभाष हनुमंता फुलमाळी (रा. नेवासे), शेटीबा रामा काकडे (रा. वाळकी, ता. नगर), अण्णा लालू फुलमाळी (रा. पारनेर), तात्या शिवराम गायकवाड (रा. शेवगाव), गुलाब शेटीबा काकडे (रा. वाळकी), साहेबा रावजी काकडे (रा. भातोडी, ता. नगर) या आठ आरोपींना गुरुवारी अटक केली, असे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी सांगितले. हे सर्व जण जातपंचायतीचे पंच आहेत. त्यांना उद्या (ता. 9) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Web Title: Youth arrest of the culprits in place for ten families excluded