जातीय द्वेषभावना निर्माण करणाऱ्या पोस्टबद्दल 10 तरुणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारचा कोणताही मेसेज सोशल मीडियावरून पाठवू नये. शेअर, लाईक, कॉमेंट करू नये. या संदर्भात तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

सोलापूर : दोन समाजांत द्वेषभावना निर्माण होईल अशाप्रकारची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी 10 तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जातीय तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात बाबासाहेबांचा पुतळा बसवल्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला. याप्रकरणी पवन आलुरे, अक्षय जाधव, किरण पवार, राम जाधव, सुहास कदम अशी आरोपींची नावे आहेत. रविकांत कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपवर द्वेषभावना निर्माण होईल, अशाप्रकरचा मेसेज पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

फेसबुक, व्हॉट्‌सऍप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय तणाव निर्माण होईल असे पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांवर कारवाई केली आहे. सादीक रजाक मकानदार, विवेक प्रभाकर मस्के, निरंजन रामेश्‍वर चंदनशिवे, सनी रोहन बसवेश्‍वर, आशिष शरण राजेश्‍वर अशी कारवाई करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारचा कोणताही मेसेज सोशल मीडियावरून पाठवू नये. शेअर, लाईक, कॉमेंट करू नये. या संदर्भात तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल. सायबर पोलिस ठाण्याचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Web Title: youth arrested for communal social media post in Solapur