तरुण चढला झाडावर अन्...

Youth Climb On Tree And Do Sholey Style Stunt
Youth Climb On Tree And Do Sholey Style Stunt

कोल्हापूर - सकाळी सहा वाजता फुलेवाडी नाक्‍यासमोरून जाणाऱ्या नागरिकांना झाडावरून आरडाओरडा आणि शिव्या ऐकायला आल्या. अनेक दुचाकीस्वार दचकून जोरात निघून गेले; पण काही नागरिक झाडाखाली जमण्यास सुरवात झाली. पाहता पाहता झाडाखाली लोकांची गर्दी झाली. कोणीतरी अग्निशामक दलाला पाचारण केले, परंतु गर्दीला पाहून ती झाडावरील व्यक्ती वर वर जात राहिली. 

काही वेळाने या व्यक्तीला खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अग्निशामक दलाने बुमच्या साहाय्याने त्याच्यापर्यंत जाण्याचा केलेला प्रयत्न अपुरा ठरला. शेवटी काही धाडसी ग्रामीण युवकांनी झाडावर चढत त्याला कसेबसे खाली आणले आणि बुधवारी (ता. ४) सकाळपासून सुमारे तीन-चार तास चाललेल्या ‘शोले स्टाईल’च्या या थरारनाट्याची अखेर झाली.

फुलेवाडी टोलनाका परिसरातील एका वडाच्या मोठ्या झाडावर चढलेल्या एका व्यक्तीने अग्निशामक दलासह नागरिकांची झोप उडवली. सकाळी सहापासून या व्यक्तीने आरडाओरडा सुरू केला. हा प्रकार पाहून थांबलेल्या नागरिकांनी त्याला खाली बोलावण्यास सुरवात करताच तोही वरवर चढू लागला. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाचे दोन ताफे, एक क्रेन दाखल झाली. अग्निशामक दलाचे कर्मचारी ‘बुम’च्या साहाय्याने झाडावर चढले. त्याला ‘खाली उतर’ अशी विनंती करत होते. मात्र, त्यांना उद्धट उत्तरे देत त्याने वर आल्यास खाली उडी मारण्याची धमकी दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाडाखाली संरक्षक जाळी धरली होती. तब्बल तीन तासांच्या थरारानंतर अग्निशामक दल व नागरिकांना त्याला वाचविण्यात यश आले. 

बुमच्या साहाय्याने त्याला आणले खाली

ग्रामीण युवकांचे झाडावर चढण्याचे कसब कामी या थरारनाट्यावेळी झाडाखाली बघे म्हणून असलेले दीपक कांबळे (प्रयाग चिखली), नवनाथ मारुती माने (जत, सांगली), दीपक दिवसे (सावरवाडी), संदीप पाटील (कोपार्डे), जोतिराम ज्ञानू पाटील (भामटे) यांनी त्या व्यक्तीचे बुममधील अग्निशामक दलाच्या जवानांशी बोलणे चालू असताना शिताफीने झाडावर चढून त्याला गाठले आणि त्याच्या लाथांचा मार सहन करत त्याचा एक पाय पकडून दोरीने बांधला व झाडावरच जखडून ठेवले. यानंतर बुमच्या साहाय्याने त्याला खाली आणले. ही व्यक्‍ती लातूर येथील असून ती काहीशी मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. यावेळी अतिरिक्त अग्निशामक अधिकारी तानाजी कवाळे, का. ना. बांदेकर, भगवान शिंगाडे, चेतन जानवेकर, शंतनू डकरे, संजय पाटील यांनी प्रयत्न केले.

जवानास कपडे काढण्यासाठी दम 

झाडावर गेलेल्या अग्निशामकच्या जवानाला खाली उडी मारण्याची भीती घालत त्या व्यक्तीने चक्क कपडे काढण्याचा जणू आदेशच दिला. त्याची अवस्था पाहून त्या फायरमननेही त्याचे ऐकत स्वत:चे कपडे काढत त्याला खाली उतरण्याची विनंती केली, तरीही त्या व्यक्तीने स्वत: कपडे काढण्यास सुरवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com